राजापूर तालुक्यात भाजपची स्थिती अद्याप शोचनियच
By admin | Published: November 2, 2014 12:50 AM2014-11-02T00:50:05+5:302014-11-02T00:50:05+5:30
कार्यकर्त्यात मरगळ : राज्यातील सत्तांतरानंतर तरी बळकटी मिळण्याची आशा
राजापूर : केंद्रापाठोपाठ राज्यातदेखील सत्तेवर आलेल्या भाजपाची राजापूर तालुक्यातील परिस्थिती अत्यंत शोचनीय असून लाभलेल्या सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात हा पक्ष बळकटी प्राप्त करील काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपाला केंद्रात पूर्ण बहुमतात सत्ता प्राप्त करता आली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा संपादन करणारा पक्ष ठरला आणि राज्याच्या सत्तेवर आला. केंद्रापाठोपाठ राज्यातदेखील सत्ता मिळाल्याने भाजपाला प्रचंड जोर चढला असला तरी राजापूर तालुक्यात मात्र या पक्षाची अवस्था अत्यंत नाजूक आहे.
मागील अनेक वर्षे केवळ राजापूर शहर वगळता उर्वरित तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपाची कुठेच शाखा नाही की पदाधिकारीदेखील नाही. आजवर फक्त एकदाच भाजपाचा सदस्य देवाचे गोठणे पंचायत समितीमधून निवडून गेला आहे. तो अपवाद वगळता एकही सदस्य पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेवर तालुक्यातून निवडून गेलेला नाही. विद्यमान क्षणीही भाजपाची पाटी कोरी करकरीत आहे.
तालुक्यातील सुमारे १०१ ग्रामपंचायतीवर भाजपाचा एकही सदस्य नाही की सरपंचदेखील नाही. केवळ राजापूर शहरातच मात्र भाजपाला नगरसेवक निवडून आणणे शक्य झाले व यापूर्वी काँग्रेस व सेनेच्या साथीने नगराध्यक्ष ते उपनगराध्यक्षपद प्राप्त करता आले आहे. तालुक्यात अत्यंत नगण्य असलेल्या भाजपाला उभारी मिळण्यासाठी केंद्र व राज्यात आलेली सरकारे टॉनिक ठरु शकतील का? हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे यापुढे भाजपाचा राजापूर तालुक्यात पक्षीय विस्तार कितपत होतो त्यावरच या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय यादवराव यांना दहा हजाराच्या आसपास मते मिळाली होती व त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. यामध्ये तालुक्याच्या काही जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात भाजपाला चांगली मते मिळाली होती. त्या जोरावर पुढील कालखंडात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचे मनसुबे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रचले असले तरी त्यांना प्रथम दोन्ही सत्तांचा चांगला उपयोग करत पक्षाचा जनाधार कसा वाढेल, त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. भाजपाचे कमळ घराघरात पोचविण्याची जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.
तालुक्यात भाजपांतर्गत दोन गट परस्पर विरोधात कार्यरत असून एका गटाचे नेतृत्व माजी अध्यक्ष महादेव गोठणकर हे तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस अनिल करंगुटकर करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे का होईना दोन्ही गटांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे जर पक्ष अधिक वाढवायचा असेल तर आपापसातील मतभेद दूर ठेवून दोन्ही गटांना एकत्र यावे लागेल. तरच भाजपाचे कमळ या तालुक्यात फुलेल. अन्यथा ते कोमेजून जाईल अशीच इथली परिस्थिती राहिल. (प्रतिनिधी)