विजेअभावी लोकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:53+5:302021-07-27T04:32:53+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन ...
रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. तसेच अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले आहेत.
पुर्ये पूल वाहतुकीसाठी बंद
साखरपा : मुसळधार पावसामुळे साखरप्यानजीकच्या पुर्ये गावाला जोडणारा काजळी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. घाटीवळे येथे झाड पडून कोल्हापूर महामार्ग बंद करण्यात आला होता. काजळी नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
साथींचा उद्रेक राेखण्यासाठी उपाययोजना
रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूरपरिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवण्याचा धोका आहे. अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर अशा आजारांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सभापतींकडून दिलासा
देवरुख : अतिवृष्टीचा फटका बावनदीवर असलेल्या सर्व गावांना बसला आहे. यामध्ये आंगवली, बामणोली, खडीकोळवण ह्या ठिकाणचा रस्ता पाण्याने वाहून गेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाळ साचला आहे. त्यामध्ये लोकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्तांना सभापती जया माने यांनी दिलासा दिला आहे.
माडी विक्रेत्यांना मिळणार दिलासा
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना माडी विक्रेत्यांकडून परवाना शुल्काच्या स्वरुपात घेण्यात आलेली वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा म्हणून अनेक माडी व्यावसायिक तसेच संघाकडून वारंवार मागणी करण्यात आली होती. शासनाने वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.