परिषद भवनातील कामात अपहार
By admin | Published: June 8, 2015 10:14 PM2015-06-08T22:14:47+5:302015-06-09T00:11:10+5:30
अंकुश नाही : नेमका टक्का कोणाला...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची सुरुवात परिषद भवनातूनच झाली आहे. परिषद भवनातील मीटर रूमच्या दुरुस्तीचे काम दाखवून ५० हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे काम न करताच रत्नागिरी बांधकाम विभागाने हे बिल खर्ची टाकले आहे.जिल्हा परिषदेमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विकासकामे करण्यात येतात. मात्र, या कामांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येतो. टक्केवारीमुळे ठेकेदार मंडळींकडून दर्जाहीन कामे केली जातात. कोणतेही काम असले, तर लोकप्रतिनिंधीपासून अधिकाऱ्यांपर्यंत टक्का मोजण्यात येतो.विकासकामे करताना सर्वांना सांभाळून घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची मर्जी राखणाऱ्या ठेकेदारानाच विकासकामांचा ठेका दिला जातो. मग ते काम टिकाऊ झाले नाही तरी चालेल. त्याची तपासणी करणारेही तेच अधिकारी असतात. त्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर काही दिवसांत खड्डे पडलेले दिसून येतात. परिषद भवनातही काम दाखवून शासनाची रक्कम लाटण्याचा प्रकार घडला आहे. मार्च, २०१४ पूर्वी ५० हजार रुपयांचे बिल खर्च करण्यात येत आहे. परिषद भवनाच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर रुमच्या दुरुस्तीचे काम काढण्यात आले होते. प्रत्यक्षात या मीटर रुमची काहीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काम न करताच बिल खर्ची घालण्यात आले आहे. हे पैसे कोणाच्या घशात घालण्यात आले, त्याचा शोध नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार यांनी घ्यावा. एकूणच प्रकाराची चौकशी झाल्यास परिषद भवनातील इतर कामांमध्ये झालेला भ्रष्टाचारही या अनुषंगाने उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याची मानसिकता हवी, अशी अपेक्षा कर्मचारीच करत आहेत. (शहर वार्ताहर)
काम न करताच बिले खर्ची
काम न करताच रत्नागिरी बांधकाम विभागाने बिल खर्ची कसे टाकले.
जिल्हा परिषदेमध्ये विविध योजनांतून ग्रामीण भागाचा विकास होतो शक्य.
परिषद भवनातही काम दाखवून शासनाची रक्कम लाटण्याचाच प्रकार उघड.
मीटर रूमची दुरूस्ती गेली कुठे असा प्रश्न विचारला जातोय.
विकासकामे करताना मर्जी कुणाची राखली जातेय..