helmet compulsory: हेल्मेट वापराबाबत रत्नागिरीकरांमध्ये संभ्रमावस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:07 PM2022-04-04T17:07:20+5:302022-04-04T17:07:51+5:30
काहींना वाटते हेल्मेट असावे तर काहीजण शहरात हेल्मेट नकाेच, असा सूर आळवत आहेत. नाही वापरला तर पाेलिसांची दंडाची पावती हातात पडतेच.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्ती पुण्याच्या धर्तीवर बंद करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले हाेते. त्याचवेळी त्यांनी ४ तारखेपर्यंत परिपत्रक काढले नाही तर रत्नागिरीकरांनी हेल्मेट वापरु नये, अशी सूचनाही केली. मात्र, त्यानंतर रत्नागिरीकरांमय्ये संभ्रमावस्थाच आहे. काहींना वाटते हेल्मेट असावे तर काहीजण शहरात हेल्मेट नकाेच, असा सूर आळवत आहेत. नाही वापरला तर पाेलिसांची दंडाची पावती हातात पडतेच.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दाेन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती करू नये, अशी सूचना केली. पुण्याच्या धर्तीवर नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही सांगून याबाबतचे परिपत्रक ४ एप्रिलपर्यंत काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर रविवारी अचानक जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढल्याची माहिती साेशल मीडियावर फिरू लागली.
हेल्मेट वापरातून रत्नागिरीकरांची सुटका झाल्याच्या आनंदात साेमवारी अनेकजण रस्त्यावर विना हेल्मेट फिरू लागले. पण, त्याचवेळी पाेलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर अशाप्रकारचा काेणताही अध्यादेश काढण्यातच आलेला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे रत्नागिरीकरांमध्ये हेल्मेट वापराबाबत अजूनही संभ्रमावस्थाच आहे.
रत्नागिरी शहरात बहुतांशी नागरिक सुरक्षितता म्हणून हेल्मेटचा वापर करतात. याला अपवाद काही राजकीय मंडळी आहेत. ही मंडळी बिनधास्तपणे रस्त्यावर विनाहेल्मेट फिरताना दिसतात. त्यामुळे हेल्मेट वापराची सक्ती नकाे असा सूर आळवण्यात आला. याबाबत काही नागरिकांची मते जाणून घेतली असता, हेल्मेट सुरक्षित असून, ते वापरलेच पाहिजे. असे सांगण्यात आले. तर काहींनी महामार्गावर हेल्मेट आवश्यकच आहे. पण, साळवी स्टाॅप ते पेठकिल्लापर्यंत हेल्मेट सक्ती असू नये असे सांगण्यात आले.