खोट्या पोस्टमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:19+5:302021-04-20T04:33:19+5:30
रत्नागिरी : कोरोनाचे संकट वाढत असतानाच त्याचे गांभीर्य नसलेल्यांकडून सोशल मीडियावर उलटसुलट अफवांना पीक आले आहे. लाॅकडाऊन काळातील प्रशासनाच्या ...
रत्नागिरी : कोरोनाचे संकट वाढत असतानाच त्याचे गांभीर्य नसलेल्यांकडून सोशल मीडियावर उलटसुलट अफवांना पीक आले आहे. लाॅकडाऊन काळातील प्रशासनाच्या नियमावलीबाबतही व्हाॅटस ॲपवर पसरविल्या जाणाऱ्या खोट्या पोस्टमुळे व्यापारी आणि नागरिक यांच्यात संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.
प्रशासनाकडून लाॅकडाऊन काळात काढल्या जाणाऱ्या नियमावलीबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. ही देताना अधिकृत अधिकाऱ्याच्या सहीनिशी ही नियमावली प्रसिद्ध केली जात आहे. मात्र काही वेळा त्या नियमावलीशी साधर्म्य दाखविणारे मुद्दे टाकून नागरिक तसेच व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोमवारीही अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील, अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. मात्र, त्यावर कुठल्याही अधिकाऱ्याचे नाव व शिक्का नव्हता. मात्र, ही पोस्ट सर्वत्र फिरत असल्याने व्यापाऱ्यांनीही ही पोस्ट खरी आहे की काय, याविषयी शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांना हे खरे असल्याचे वाटल्याने हायसे वाटले.
मात्र, याबाबत स्थानिक प्रशासनाकडे विचारणा करता ही पोस्ट अफवा असल्याचे सांगण्यात आले.
सध्या अशा अनेक खोट्या पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न केेला जात असल्याने सद्य परिस्थितीत गोंधळलेल्या नागरिकांच्या मनातील गोंधळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवरही कडक निर्बंध आणावेत व अशा खोट्या अफवा पसरविण्यापासून रोखावे, अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
कोट
नागरिकांनी कुठल्याही खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून नियमावली काढली जाते, ती अधिकृत सही तसेच शिक्क्यासह असते. त्यामुळे नागरिकांनी याबाबत शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा.
- शशिकांत जाधव, तहसीलदार, रत्नागिरी