आरोग्यसेवक भरती परीक्षेत दापोलीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:38 PM2021-03-01T20:38:36+5:302021-03-01T20:39:43+5:30
dapolie police parade ground Ratnagirinews- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दापोलीतील एन. के. वराडकर बेलोसे कॉलेजला परीक्षेची कोणतीच कल्पना न दिल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.
दापोली : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दापोलीतील एन. के. वराडकर बेलोसे कॉलेजला परीक्षेची कोणतीच कल्पना न दिल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.
परीक्षा घेणाऱ्या संस्थेने लेखी न कळविल्याने कॉलेजने परीक्षेची कोणतीच तयारी केलेली नसल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर संतप्त भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
आरोग्य विभागाच्या विविध पदांकरिता रविवारी जिल्ह्यात लेखी परीक्षा घेण्यात आल्या, या परीक्षेसाठी दापोलीत आर. एन. वैद्य व एन. के. वराडकर कॉलेज अशी दोन परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आली होती. दापोलीतील दोन्ही केंद्रांवर तब्बल ८७५ विद्यार्थी महाराष्ट्रातून आले होते. मात्र, एन. के. वराडकर कॉलेजमध्ये परीक्षेची कोणतीच तयार केलेली नसल्याने परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला.
परीक्षेची वेळ १० वाजण्याची देण्यात आली होती. मात्र, सकाळी ९.३० वाजले तरीही परीक्षा केंद्र बंद असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. या ठिकाणी केंद्राने केवळ एकच सुपरवायझर नेमला होता; तर अन्य कोणी त्या ठिकाणी आले नव्हते; तर दुसरीकडे परीक्षा केंद्रात बेंचवर विद्यार्थ्यांचे क्रमांकही टाकण्यात आलेले नव्हते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला.
विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर दापोलीचे तहसीलदार सुरेश खोपटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ तसेच एन. के. वराडकर कॉलेजचे प्राचार्य सुरेश निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ रोल नंबर टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. रोल नंबर टाकून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या.
अर्धा तास उशीर
दापोलीतील आर. एन. वैद्य कॉलेजमध्ये ३३८ तर एन. के. वराडकर कॉलेजमध्ये ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा पेपर सकाळी १० वाजता सुरू होणार होता. मात्र, गोंधळामुळे परीक्षा १०.३० वाजता सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढवून देण्यात आला होता. दापोलीतील दोन्ही केंद्रावर एकाच वेळी परीक्षा सुरू करण्यात आली.
अनेकांची परीक्षेकडे पाठ
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र होती. या परीक्षा केंद्रावर १४,५२० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात १४३७ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. राजापूर येथील एका केंद्रावर ४८० पैकी ४६ विद्यार्थीच उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील केंद्रावर २१६ पैकी १९, हातखंबा येथील केंद्रावर २८८ पैकी केवळ २५ विद्यार्थी उपस्थित होते. कुवारबाव येथील केंद्र परीक्षार्थ्यांअभावी रद्द करण्यात आले.