मिनी बाजारपेठेबाबत संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:10+5:302021-07-14T04:37:10+5:30
आवाशी : खेड तालुका औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या लोटे-घाणेखुंट मिनी बाजारपेठेसह पिरलोटे, आवाशी, असगणी, लवेल - दाभिळ या बाजारपेठांतील ...
आवाशी : खेड तालुका औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या लोटे-घाणेखुंट मिनी बाजारपेठेसह पिरलोटे, आवाशी, असगणी, लवेल - दाभिळ या बाजारपेठांतील वीकेंड लॉकडाऊनसह सरसकट दुकाने उघडी राहत असल्याबाबत व्यापाऱ्यांतून संभ्रम कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून टाळेबंदी सुरू आहे. अद्यापही ब्रेक द चेनला संपूर्णपणे यश आलेले नसल्याने जिल्ह्यातील बाजारपेठा ठरावीक वेळेतच सुरू आहेत.
खेड तालुक्यातील गावातील सर्वच दुकाने संपूर्ण आठवडाभर उघडी असतात. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवायची आहेत. मात्र येथे अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने दररोज उघडली जात आहेत.
ज्यांनी या सर्व नियमांचे पालन केले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तर दुसरीकडे परवानगी नसतानाही दुकाने उघडली जात असल्याने यामागचे गौडबंगाल कायम आहे. तरी नेमकी कोणती दुकाने सुरू राहतील व कोणती बंद राहावीत तसेच वीकेंड लॉकडाऊन कायम आहे की नाही याची स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना माहिती द्यावी, अशी मागणी केली जात आहे.