Teacher recruitment : ..तरीही दुसऱ्या भरतीची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 04:28 PM2021-11-24T16:28:08+5:302021-11-24T16:28:55+5:30
रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) राज्यात घेण्यात आली. २०१९ मध्ये पवित्र प्रणालींतर्गत ...
रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) राज्यात घेण्यात आली. २०१९ मध्ये पवित्र प्रणालींतर्गत शिक्षण सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी अद्याप अर्धवट आहे. मराठी व इंग्रजी माध्यमांची ७०३ शिक्षण सेवक पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती, पैकी ४०९ पदेच भरण्यात आली आहेत.
पहिल्या भरतीतील पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यात ७३०६ प्राथमिक शिक्षकांची पदे मंजूर असून, प्रत्यक्ष ६२६३ शिक्षक कार्यरत आहेत. अद्याप १०४३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमांची ६८१५ पदे मंजूर असून, ५८७२ पदे भरलेली आहेत; मात्र ९४३ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमांंची ४९१ पदे मंजूर असून, ३९१ पदे भरलेली आहेत, पैकी १०० पदे रिक्त आहेत. वारंवार होणारी जिल्हा बदली, सेवानिवृत्ती यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्तपदांची संख्या वाढतच आहे.
पवित्र प्रणाली अंतर्गत पहिल्या शिक्षणसेवक भरतीतील २९४ पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. त्यातच येत्या फेब्रुवारीत दुसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचे शासनाने जाहीर केले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून २०१९ मध्ये पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये मराठी माध्यमाचे ६५९ शिक्षण सेवकांची जाहिरात असताना ४०० शिक्षण सेवक प्राप्त झाले. उर्दू माध्यमांच्या ४४ शिक्षण सेवकांची भरती असताना प्रत्यक्ष नऊच शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली. या भरतीमध्ये उर्दू माध्यमांसह मराठी माध्यमांतील २९४ पदे रिक्त राहिल्याने रिक्तपदांची आकडेवाडी वाढू लागली आहे.
शासनाने भरतीसाठी दुसरी यादी ऑगस्ट २०१९ रोजी जाहीर करण्याचे जाहीर केले होते; मात्र राज्यभरातील डीएड, बीएडधारकांच्या विरोधामुळे ही यादी जाहीर होण्यास विलंब झाला. उमेदवारांनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रेंगाळली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सप्टेंबर २०२१ च्या सुरुवातीला अनुदानित संस्थांवरील शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्यात आली. राज्यात मुलाखतीसह २ हजार ६२ जागांची निवड यादी लावली. संस्थांनी या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या; मात्र अनेकांना अजूनही निवड पत्रे देण्यात आलेली नाहीत. खासगी संस्थांची यादीही अद्याप जाहीर केलेली नाही.
भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या पहिल्या अभियोग्यता परीक्षेला चार वर्षे लोटून गेल्यानंतरही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नसताना सरकारकडून दुसऱ्या चाचणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरी अभियोग्यता शिक्षक भरती परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याबाबत शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. यामुळे यापूर्वी पात्र असलेल्या उमेदवारांत संभ्रम वाढला आहे.
अभियोग्यता चाचणीत जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या शाळांवर नोकरी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये हजार पदे रिक्त आहेत. ती भरणे अपेक्षित आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता परीक्षा जाहीर केली असली तरी रखडलेली भरतीही प्राधान्याने पूर्ण करावी. - संदीप गराटे, अध्यक्ष, कोकण डीएड, बीएड संघटना.