पक्ष जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसची आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:30 AM2021-03-28T04:30:16+5:302021-03-28T04:30:16+5:30
चिपळूण : सध्या काँग्रेसमध्ये बेबंदशाही सुरू आहे. शिवसेनेत तारतम्य राहिलेले नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ...
चिपळूण : सध्या काँग्रेसमध्ये बेबंदशाही सुरू आहे. शिवसेनेत तारतम्य राहिलेले नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला नाइलाजाने आंदोलने करावी लागत असल्याचा टोला भाजपचे प्रवक्ते मधुकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत हाणला.
शनिवारी चिपळूण दौऱ्यावर आलेले चव्हाण म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने २००६ मध्ये शेती कायदा अहवाल दिला होता. २०१४ मध्ये त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आठ वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे जाणते राजे शरद पवार काय करीत होते, असा प्रश्न त्यांनी केला. संसदेत शेती कायद्यावर तब्बल १२ वेळा चर्चा झाली. त्यावर विरोधकांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केलीच नाही. केवळ कायदा मागे घ्या, हीच त्यांची मागणी होती. सुधारित शेती कायद्याने शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेत आपला शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य आहे. यातील सर्वच बाबी या शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्याने मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी केली. याबद्दल स्वामीनाथन यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.
काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केवळ दलालच निर्माण करण्याचे काम केले. शेती व्यवस्थापनातील दलाली बंद झाल्याने काँग्रेसचे नेते विरोधाचे राजकारण करीत आहे.
सद्य:स्थितीला काँग्रेसमध्ये प्रचंड मरगळ आलेली आहे. पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या शिवसेनेमुळे काँग्रेस जिवंत आहे, असेही ते म्हणाले.
कामगार कायद्याबाबत ते म्हणाले की, काँग्रेस सरकारने लोकरंजनाचेच कायदे केले. मात्र, भाजप सरकारने उद्योजक आणि कामगार या दोघांचाही समतोल साधला आहे. काँग्रेस सबसिडी देऊन केवळ लोकांना परावलंबित्व दिले. ज्याला आवश्यक आहे, त्यालाच मदत करण्याची भूमिका केंद्राने घेतली. यातूनच शेतकऱ्यांना प्रत्येकी 6 हजारांचे अनुदान देण्यात आले. काँग्रेस आणि शिवसेनेच्या भानगडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच राज्य कारभार चालवत आहेत. शेतकरी आणि कामगार कायद्याविरोधी आंदोलने करून केवळ पक्ष जिवंत ठेवण्याचा खटाटोप काँग्रेसकडून सुरू आहे, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष विनोद बोभस्कर, रामदास राणे, प्रणय वाडकर, महेश दीक्षित आदी उपस्थित होते.
..................
फोटो
पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते मधुकर चव्हाण यांच्या सोबत विनोद बोभस्कर, रामदास राणे उपस्थित होते.