काँग्रेसची साखळी आंदोलने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:39+5:302021-07-12T04:20:39+5:30
चिपळूण : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विजय भोसले यांच्या निधनामुळे पंधरा दिवस जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाकडून दुखवटा पाळावा व नियोजित पक्षीय कार्यक्रम ...
चिपळूण : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विजय भोसले यांच्या निधनामुळे पंधरा दिवस जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाकडून दुखवटा पाळावा व नियोजित पक्षीय कार्यक्रम रद्द करावेत, अशी सूचना प्रदेश कमिटीकडून आल्याने पक्षातर्फे आयोजित साखळी आंदोलने पंधरा दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहेत.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले
रत्नागिरी : जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दररोज घडत आहेत. वेळोवेळी पोलीस यंत्रणेकडून, तसेच संबंधित बँकांकडून ऑनलाइन फसवणुकीबाबत सूचना देण्यात येऊनही लोक फसत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गावठी हातभट्ट्यांविरोधात मोहीम
चिपळूण : चिपळूण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून हातभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्यात अन्य ठिकाणीही राबविण्याची मागणी पुढे येत आहे.
उतारावर कठडे हवेत
रत्नागिरी : जिल्ह्यात छोटे-मोठे अनेक मार्ग आहेत. या मार्गावरून प्रवास करताना एका बाजूला उंच डोंगर आहेत, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. यावेळी अपघात घडल्यास एखादे वाहन सुरक्षित राहावे, यासाठी कठडे उभारले जातात, परंतु अनेक ठिकाणी अजूनही कठडे नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी कठडे घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
नायरी-रत्नागिरी बस सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक प्रचिती गडाच्या दुर्गम परिसरातील जनतेसाठी थेट रत्नागिरी एसटी बस सुरू करण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने देवरुख डेपो व्यवस्थापकांकडे केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते अशोक जाधव यांच्याकडे केली होती. त्यासाठी जाधव हे पाठपुरावा करीत आहेत.
ब्रिटिशकालीन पुलाच्या रस्त्याची दुरवस्था
राजापूर : महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलापासून मच्छीमार्केट-कोंढेतड पुलापर्यंत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करूनही त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.