सेनेची काँग्रेस करू नका : सचिन कदम
By Admin | Published: December 30, 2014 09:34 PM2014-12-30T21:34:47+5:302014-12-30T23:34:59+5:30
सल्लावजा कानपिचक्या : संपर्क दौऱ्यात ठिकठिकाणी घेतल्या कार्यर्त्यांच्या बैठका
चिपळूण : दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेऊन झालं गेलं विसरुन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. अंतर्गत मतभेदातून काँग्रेस संपली, हा इतिहास लक्षात ठेवा आणि शिवसेनेची काँग्रेस होऊ देऊ नका, असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दापोली तालुका कार्यकर्ता बैठकीत केले.
आपल्या संपर्क दौऱ्यात कदम यांनी दापोली आणि मंडणगड तालुका कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन विचार ऐकून घेतले. येथील तालुका कार्यालयात झालेल्या या बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख शांताराम पवार, शहरप्रमुख सुहास खानविलकर, युवा सेनेचे ऋषिकेश गुजर, नगराध्यक्ष जावेद मणियार, उदय जावकर, विश्वास कदम, महिला आघाडीप्रमुख उल्का जाधव, माजी सभापती रोहिणी दळवी आदी सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुखांनी कार्यकर्त्यांची मते ऐकून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले. दापोली - मंडणगड मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, अंतर्गत मतभेदामुळे पराभव झाला आहे. गटातटाच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात पक्षाचे नुकसान झाले आहे, हे नाकारता येणार नाही. गटातटाच्या राजकारणात राहून कार्यकर्त्यांनी संघटनेचे नुकसान होऊ देऊ नका. देशातील सर्वाधिक वर्षाची काँग्रेस केवळ अंतर्गत मतभेदामुळे आज संपली. मतभेदामुळे आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे आपला पराभव झाल्याचे त्यांचे नेते सांगत आहेत. हा राजकीय इतिहास लक्षात घेऊन त्यातून आपण बोध घेणे गरजेचे आहे. सामान्य कार्यकर्ता पक्षासाठी विविध निवडणुकांमध्ये जीवाचे रान करतो. पण, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकांच्या वेळी अंतर्गत नाराजी, मतभेद, गटतट आडवे आले, तर त्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुखांची शिवसेना यापलिकडे विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहून निष्ठेने काम करावे.
येत्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मरगळ झटकून कामाला लागल्यास दापोलीत पुन्हा भगवे चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
निवडणुकीनंतर संपर्कदौरा आयोजित करुन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविल्याबद्दल पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्हाप्रमुखांना धन्यवाद दिले. या दौऱ्यात कदम यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या सर्व अडचणींच्या उपाययोजनेबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. दापोली - मंडणगड परिसरात कदम यांनी दौरा करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविल्याबद्दल परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी समाधान व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
...आक्रमक व्हा
रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यांमधून शिवसेनेची ताकद आजही तशीच आहे. दापोलीची जागा विरोधकांच्या ताकदीवर नव्हे; तर शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांवर गेली. सर्वात मजबूत, सुरक्षित मतदार संघ म्हणून दापोलीकजडे पाहिले जायचे. आता तो इतिहास कायम ठेवावा. त्यासाठी संघटनेतील शिस्त पाळण्याचे व प्रसंगी आक्रमक होण्याचे धोरण पदाधिकारी, संघटकांनी स्विकारावे, असे कदम यांनी सांगितले.
कानपिचक्या
दापोली-मंडणगड संपर्क दौऱ्यात सचिन कदम यांनी दिल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या.
मतभेदातून काँग्रेस संपली; आपण संपूया नको.
बालेकिल्ला ढासळता कामा नये , आजही ताकद आहे. मात्र, अंतर्गत मतभेदच पराभवाला कारण.
गटातटाच्या व पाडापाडीच्या राजकारणाला कार्यकतेर्ही कंटाळले.
शिवसेना लढवय्यांची राहावी अशी अपेक्षा.