काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर शेट्येंचा राजीनामा
By admin | Published: July 15, 2017 02:38 PM2017-07-15T14:38:58+5:302017-07-15T14:38:58+5:30
तरुणांकडे नेतृत्व देण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
देवरूख (जि. रत्नागिरी), दि. १५ : संगमेश्वर तालुका काँगे्रसचे तालुकाध्यक्ष शंकर शेट्ये यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविला आहे. शेट्ये यांनी २००४ सालापासून काँगे्रसचे तालुका अध्यक्षपद भूषविले होते.
शेट्ये हे पूर्वी सेनेत होते. त्यानंतर २००४ साली काँगे्रसवासी झाले. शंकर शेट्ये यांच्या कामाची पध्दत, पक्षांच्या वरिष्ठांशी असलेले संबंध यामुळेच काँगे्रस तालुकाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या हाती देण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत असलेल्या सर्व निवडणुकांसाठी त्यांनी चांगली प्रचार यंत्रणा राबविली. सुभाष बनेसमर्थक म्हणून काँगे्रसमध्ये शेट्ये यांची ओळख होती. मात्र, बनेंनी २०१४साली स्वगृही सेनेत प्रवेश केल्यावर शेट्ये यांनी काँगे्रसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे बनेसमर्थक ही लागलेली ओळख शेट्ये यांनी पुसून काढली.
शेट्ये यांची प्रकृती वारंवार बिघडत असते. त्याचप्रमाणे आज राजकारणात तरूणांकडे नेतृत्व असावे, असा त्यांचा कयास आहे. यामुळेच या पदाला चिकटून न राहता नवीन तरूणांना या पदावर बसवून पक्षाचे चांगले काम होईल, असा त्यांचा विश्वास आहे. याच उद्देशाने यापुढेही आपण काँगे्रसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राहून काम करणार असल्याचे शेट्ये यांनी नमूद केले. त्यांनी गुरूवारी आपल्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे.