निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेतृत्त्वहीन
By admin | Published: September 3, 2016 10:56 PM2016-09-03T22:56:45+5:302016-09-04T00:42:31+5:30
जिल्हाध्यक्षपद रिक्त : नेत्यांच्या लाथाळ्यांमुळे सर्वसामान्य कॉँग्रेस कार्यकर्ता सैरभैर...
रत्नागिरी : नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आत्तापासूनच सुरू झाली आहे. अन्य पक्षांचे निवडणूक अश्व आतापासूनच उधळले आहेत. मात्र, देशातील एक प्रमुख पक्ष असलेल्या कॉँग्रेसच्या जिल्ह्यातील गोटात सारे काही सामसूम आहे. निवडणुका तोंडावर असतानाही जिल्हा कॉँग्रेस नेतृत्त्वहीन झाली आहे. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. गेल्या वर्षभरात या पक्षाला जिल्हाध्यक्ष सापडलेला नाही. नेत्यांच्या लाथाळ्यांमुळे कार्यकर्त्यांचे हाल झाले आहेत.
कॉँग्रेसचे रमेश कीर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वर्षभरापूर्वीच दिला आहे. त्यानंतर कोण जिल्हाध्यक्ष होणार, या मुद्यावर एकमत होत नसल्याने अद्याप हे पद रिक्तच आहे. चार महिन्यांपूर्वी हे पद भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर इब्राहीम दलवाई, संजय रेडीज, मंगेश शिंदे व नीलेश राणे ही चार नावे जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेश कॉँग्रेसकडे पाठविण्यात आली. त्यालाही आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
गेल्या महिन्यात मुंबईत कॉँग्रेसची बैठक झाली. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाबाबत ऐक्य घडविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या बैठकीत माजी खासदार नीलेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या नावाला काही नेत्यांनी आक्षेप घेतला. जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्यातीलच हवा, असा मुद्दा मांडत भाई जगताप यांनी अप्रत्यक्षपणे नीलेश राणे यांना विरोध दर्शविला होता. तसेच अन्य कोणत्याही नावावर यावेळी मतैक्य झालेले नाही. कॉँग्रेसच्या निवड पध्दतीनुसार प्रथम जिल्ह्यातून इच्छुकांची यादी प्रदेश कॉँग्रेसकडे पाठविण्यात येते. त्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांशी प्रदेश अध्यक्ष चर्चा करतात. चर्चेनंतर एक नाव पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठविले जाते. त्याबाबत पक्षाध्यक्ष चर्चा करून संबंधिताच्या नावावर अंतिम मोहर उमटवतात. निवडीची घोषणा ही पक्षाच्या केंद्रीय प्रवक्त्याकडून केली जाते. मात्र, जिल्हाध्यक्षपदासाठी गेलेल्या नावांवर एकमत होत नसल्याने हे पद कोणाकडे सोपवावे, याबाबत अध्यक्षांसमोरही पेच निर्माण झाला आहे.
आजच्या घडीला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद द्यावे, असे धडाडीचे व्यक्तिमत्त्व कॉँग्रेसमध्ये सध्यातरी दिसत नाही. दुसऱ्या पक्षातील एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन त्याच्याकडे ही जबाबदारी दिली तर जुना-नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ज्याच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल, त्याला संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी नियुक्त करावे लागतील. येणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबवावी लागेल. जिल्ह्यात कॉँग्रेस कार्यकर्ते विखुरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना एकत्र आणणे वाटते तेवढे सोपे काम नाही. हे शिवधनुष्य उचलण्याची तयारी जरी एखाद्या नेत्याने दाखवली तरी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी करणे शक्य नाही. कोणीही जिल्हाध्यक्षपद स्वीकारले तरी या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळविणे सोपे नाही. मात्र, निवडणुकांममधील अपयशाचे खापर हे जिल्हाध्यक्षांवर फोडले जाणार आहे.
एकेकाळी कॉँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होता. आज मात्र हा पक्ष विस्कटलेल्या स्थितीत आहे. निवडणुका समोर असताना कॉँग्रेसला जिल्हाध्यक्ष नाही, ही खरंतर पक्षासाठी लाजीरवाणी बाब आहे. अन्य पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असताना कॉँग्रेसच्या गोटात सामसूम कशी, असा सवाल केला जात आहे. जर ‘प्रदेश’ला जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती मिळत नसेल तर आधीचे अध्यक्ष रमेश कीर यांच्याकडेच पुन्हा जबाबदारी सोपवणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे. कॉँग्रेस बळकट होण्यासाठी पक्षात असलेले सवतसुभे संपुष्टात आणणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी कोणत्याही परिस्थितीत हे पद पुन्हा न स्वीकारण्यचा निर्णय घेतला असल्याने त्यासाठी चार जणांची नावे प्रदेश अध्यक्षांकडे गेली आहेत. त्यापैकी कोणत्याही एका नावावर एकमत होत नसल्यानेच तिढा निर्माण झाला आहे. इब्राहीम दलवाई, मंगेश शिंदे, नीलेश राणे व संजय रेडीज या चारजणांची नावे प्रदेश कॉँग्रेसकडे सुचविण्यात आली आहेत. त्यातील कोणतेच नाव मान्य होत नसल्याने नव्याने नावांची यादी मागविली जाणार का, याबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.