LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा
By शोभना कांबळे | Published: May 7, 2024 04:33 PM2024-05-07T16:33:16+5:302024-05-07T16:34:25+5:30
‘प्राचीन कोकण म्युझियम’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अनोखा संदेश
रत्नागिरी : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच मतदान जेवढे महत्वाचे तेवढेच निसर्ग रक्षणही महत्वाचे आहे ही संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचायला हवी, या जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत प्राचीन कोकण म्युझियमच्या माध्यमातून 'मतदानाप्रमाणे निसर्गरक्षण महत्वाचे' असा संदेश देणारा अनोखा देखावा साकारण्यात आला आहे. हे मतदान केंद्र विशेष आकर्षण ठरले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, मंगळवारी पार पडत आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, तेवढेच निसर्ग रक्षणही महत्वाचे आहे, ही संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचायला हवी, असे मत मांडले. ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी या पर्यावरण केंद्राच्या उभारणीकरीता रत्नागिरीतील गणपतीपुळ्याच्या प्रसिद्ध प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांच्याकडे यासंदर्भात देखावा तयार करण्याची विनंती केली होती.
गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण हे म्युझियम हे गेली २० वर्षे निसर्ग रक्षणाचेच कार्य करत आहे. त्यासाठी त्यांनी नियोजन करून आपल्या कल्पनेतून या शाळेत विविध रुपात पर्यावरणाशी निगडीत गोष्टींचा समावेश करून निसर्ग पर्यटन केंद्र साकारले. कोकणचा समृद्ध निसर्ग दाखवणारा देखावा मतदारांसाठी तयार केला. कोकणामध्ये सर्व साधारणपणे आढळणारे बिबटे, ब्लॅक पँथर, हरीण, आदींचा समावेश या दृश्यात करण्यात आला. समृध्द जलाशय त्यामागचे हिरवेगार जंगल आणि त्या जंगलासमोर विहारणारे जंगलातील विविध जंगली प्राणी हे एकोप्याने या दृष्यामध्ये नांदताना दिसले. पाणवठा एक आहे पण जंगलातील सगळे प्राणी त्या ठिकाणी एकत्र येऊन सहजीवन अनुभवत आहेत अशी संकल्पना तयार केली.
तसेच या ठिकाणी सेल्फी पॉइंटही तयार केला. त्यामध्ये कोकणामध्ये आढळणारी कासवे, खवल्या मांजर, दुर्मिळ होत चालणारे ग्रेट इंडियन हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी आणि बिबट्या या सगळ्यांबरोबरचे सहजीवन आपण जगलो तरच कोकणचा समृध्द निसर्ग टिकून राहिल आणि तो टिकविण्यासाठी झाडे वाचवायला हवीत असा संदेश या दृष्यातून देण्याचा प्रयत्न केला. गणपतीपुळेत या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.