पालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:09+5:302021-05-06T04:34:09+5:30
रत्नागिरी : कोरोना काळात शाळा बंद असून, काही शाळा ऑनलाइन पद्धतीने वर्ग भरवीत आहेत. लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांना आर्थिक संकटाला ...
रत्नागिरी : कोरोना काळात शाळा बंद असून, काही शाळा ऑनलाइन पद्धतीने वर्ग भरवीत आहेत. लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना शुल्क कमी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
जनजागृती अभियान
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानास प्रारंभ झाला आहे. गावातील प्रत्येक वाडीवर जाऊन जनजागृती, तसेच कुटुंबातील सदस्यांची तपासणी करणयात येत आहे.
मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप
दापोली : लोकनेते (कै.) बाबूजीराव बेलोसे यांचा ३५ वा स्मृती दिन व दानशूर न. का. वराडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयास २५ लिटर सॅनिटायझर व १०० मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी आर. व्ही. बेलोसे एज्युकेशनल फाउंडेशनच्या चेअरमन जानकी बेलोसे, सुनीता बेलोसे आदींची उपस्थिती होती.
पासची मागणी
चिपळूण : ग्रामीण भागातून शहरात घरकाम करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला येतात. मात्र, त्यांना एसटी पास मिळत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यांना तत्काळ पास मिळवून देण्याची मागणी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव यांनी केली आहे. आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून याबाबत चर्चाही केली आहे.
विक्रीसाठी सवलत
चिपळूण : प्रशासनाने आठवडाभर सकाळी ७ ते ११ या वेळेत आंबे, कोंबडी, मटण, अंडी व खाद्यपदार्थ विक्रीसाठी दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे खवय्यांना दिलासा मिळाला आहे. ११ नंतर घरपोच विक्रीसाठी सवलत दिली आहे. शासनाच्या नियमांचे पालन करूनच विक्री करण्याचे आवाहन विक्रेत्यांना करण्यात आले आहे.
हल्ल्याचा निषेध
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर हिंसक हल्ला झाला. त्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभर निषेध नोंदवला आहे. अभाविप कार्यालयावर हल्ला करीत गुंडाराज दाखवून दिल्याचा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
औषधांचे वाटप
देवरुख : कोकणासह अन्य भागांत कोरोना प्रतिबंधासाठी साहित्य, औषधे मोफत देण्याचा संकल्प मनसेचे डॉ. मनोज चव्हाण यांनी केला आहे. या औषधांचे वाटप व डॉक्टरांसाठी लागणारे विविध किटस् वाटपाचा प्रारंभ देवरुख येथे करण्यात आला. मातोश्री सेवाधाम, आरोग्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांच्या वतीने औषधे वाटप करण्यात आली.
हमीभावाची मागणी
रत्नागिरी : यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने कॅनिंगसाठी प्रक्रिया उद्योजकांनी अन्य राज्यांतून माल आणण्यापेक्षा स्थानिक माल विकत घ्यावा. दर्जेदार आंब्याला प्रतिकिलो किमान ४० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे.
रुग्णांसाठी वाहन उपलब्ध
राजापूर : रायपाटण कोविड रुग्णालयासाठी भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या आदेशानुसार रुग्णांना ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहन समीर खानविलकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. लॉकडाऊन असल्याने व अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने त्यांना उपचारासाठी वाहनांची आवश्यकता भासत आहे.
किराणा मालाचे वाटप
देवरुख : कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या गोवरेवाडीच्या शेजारी दख्खन गावातील गरजू २५ कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. साखरपा गोवरेवाडीतील ग्रामस्थ, मुंबई तरुण मित्रमंडळ, चेन्नई मंडळ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.