डमी उमेदवार देण्याचे षड्यंत्र:विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:59 PM2019-04-03T22:59:32+5:302019-04-03T22:59:45+5:30
कणकवली : विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुतीबाबत ते मतदारांमध्ये ...
कणकवली : विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुतीबाबत ते मतदारांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या रक्तात बेईमानी भरलेली नाही. ते निष्ठावान कार्यकर्ते असून, विरोधकांच्या गैरप्रचाराला ते कधीही बळी पडणार नाहीत, असा ठाम विश्वास रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.
कणकवली येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजप नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, राजश्री धुमाळे, जान्हवी सावंत, नीलम सावंत - पालव, शैलेश भोगले, सुशांत नाईक, संजय पडते, रमेश पावसकर, संदेश सावंत - पटेल, सुजित जाधव, गीतेश कडू , हर्षद गावडे, राजू राठोड, आंबडपाल सरपंच प्रणिता नाईक, धनंजय सावंत तसेच सेना - भाजपचे नगरसेवक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विनायक राऊत म्हणाले, विरोधकांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने या लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत या नावाचा डमी उमेदवार उभा करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र, जनता खऱ्या विनायक राऊतला चांगलेच ओळखत असल्याने काहीच फरक पडणार नाही.