सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:03 PM2022-12-17T14:03:32+5:302022-12-17T14:04:07+5:30
सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध
रत्नागिरी : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आणि मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची सूचना केली. असे प्रथमच झाले आहे. मात्र या वादातून सरकारला बदनाम करण्यासाठी पडद्यामागून डाव रचले जात असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश सामंत, उद्योजक किरण सामंत, बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणकोणत्या कामांचे डिजिटल भूमिपूजन होत आहे, याची चित्रफीत दाखवण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकार स्थापनेपासूनच्या सर्व घटनांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, निसर्गरम्य अशा कोकणात आल्यानंतर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाळासाहेबांनीही कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसानेही बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले. कोकण आणि बाळासाहेब हे एक वेगळे समीकरण झाले होते. आता बाळासाहेब आपल्यात नसले तरीही त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आपल्यासोबत आहेत.
तेच विचार कोकणच्या मातीमध्ये अगदी मुळापर्यंत रुजले आहेत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कोणीही, कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला तर आमचा कोकणी माणूस तो पुसू देऊन देणार नाही आणि नष्ट करून देणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला तर नक्की तो नाठाळाच्या डोक्यात कोकणातला नारळ फोडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.
आधीच्या सरकारच्या काळात अनेक कामे मार्गी लागलीच नाहीत. शासकीय नोकर भरती पूर्ण बंद होती. आता आपल्या सरकारने ७५ हजार लोकांची शासकीय भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हे सगळं बंद होते. आता ही सभा बघून, धडाकेबाज निर्णय बघून मोर्चा काढतील, असे सांगतानाच काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा असा टोला हसत हसत मारला.