बांधकाम क्षेत्राची गुढी आडवीच
By admin | Published: March 22, 2015 12:30 AM2015-03-22T00:30:36+5:302015-03-22T00:33:33+5:30
थंडा प्रतिसाद : फक्त चौकशी, खरेदी नाही
रत्नागिरी : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला खरेदीचा मोठा बार उडतो. गेले अनेक महिने मंदीची लाट सहन करणाऱ्या बांधकाम क्षेत्राला आजच्या दिवसाकडून विशेष अपेक्षा होती. मात्र, बांधकाम क्षेत्राची गुढी या मुहूर्तावर उभी राहिलीच नाही. फ्लॅट किंवा ब्लॉकची चौकशी करणाऱ्यांच्या तुलनेत खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी होती.
अलिकडेच रत्नागिरीमध्ये क्रेडाईतर्फे वास्तू प्रदर्शन घेण्यात आले होते. त्यात फ्लॅट्सची चौकशी मोठ्या प्रमाणात झाली. हा वर्ग गुढीपाडव्याला खरेदीदार म्हणून सामोरा येईल, अशी अपेक्षा होती. रत्नागिरीप्रमाणेच चिपळूण शहरही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंगची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही ठिकाणी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांची निराशाच केली आहे.
आजच्या दिवसात अनेक व्यावसायिकांकडे ग्राहकांनी चौकशी केली. मात्र, प्रत्यक्षात बुकिंगचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. हा प्रतिसाद १0 ते २0 टक्के इतकाच आहे.
अलिकडे मुहूर्त पाहूनच खरेदी केली जात नसल्याने बांधकाम क्षेत्राची आशा टिकून आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी आणि चिपळूण अशा दोन्ही शहरात मिळून ५00 हून अधिक तयार ब्लॉक, फ्लॅट्स ग्राहकांची प्रतीक्षा करत आहेत. (प्रतिनिधी)