मारूती मंदिर येथे नवीन शिवपुतळ्याची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 05:38 PM2020-02-19T17:38:54+5:302020-02-19T17:40:40+5:30
रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केला आहे.
रत्नागिरी : रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केला आहे.
मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची डागडुजी व परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी शिवप्रेमींकडून अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार रत्नागिरीतील जनतेला विश्वासात घेऊन, त्यांची मते विचारात घेऊन रत्नसिंधू योजनेअंतर्गत किंवा जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन पुतळा बसवण्याचा मानस आहे.
इतिहासकालीन संदर्भांचा अभ्यास करून, तज्ज्ञांची मते विचारात घेऊन महराजांचा एक तेजस्वी पुतळा या ठिकाणी उभारण्याचा संकल्प मंत्री सामंत यांनी केला आहे. शिवाय या परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येणार आहे.
याचबरोबर जिल्हा शासकीय रूग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथील सर्कल, जयस्तंभ, लक्ष्मी चौक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा येथील सर्कलचे देखील सुशोभिकरण करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी शिवजयंतीदिनी घेतला आहे. आमदार सामंत यांनी मारूती मंदिर येथे नवीन शिवपुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली आहे. त्यामुळे हा पुतळा उभारल्यानंतर रत्नागिरीच्या लौकिकात अधिक भर पडण्यास मदत होणार आहे.