'नैसर्गिक आपत्तीतही ग्राहकांना सुरळीत वीज मिळणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:03 PM2022-06-22T12:03:55+5:302022-06-22T12:04:24+5:30
'तौक्ते' व 'निसर्ग' नैसर्गिक चक्रीवादळाप्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्यानेच भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे.
रत्नागिरी : चक्रीवादळे, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीवेळीही भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण २ अंतर्गत रत्नागिरी शहरामध्ये ११ के.व्ही. कर्ला उच्चदाब उपरी विद्युत वाहिनी मार्गाचे भूमिगत विद्युत वाहिनीत रूपांतरण कामाच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यात ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते.
यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता विजय भटकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई उपस्थित होते.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना समुद्र किनारपट्टीच्या भागात खाऱ्या हवामानामुळे वीज वाहिन्या गंजतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे अशा घटना घडतात. वीज ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होतो. भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे या भागातील महावितरणचेही नुकसान टळेल व वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम गतीने करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
'तौक्ते' व 'निसर्ग' नैसर्गिक चक्रीवादळाप्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्यानेच भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. आपत्तीप्रसंगी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या कामाचे ऊर्जामंत्री राऊत यांनी कौतुकही केले.