संपर्क तुटलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:32 AM2021-07-28T04:32:43+5:302021-07-28T04:32:43+5:30
सुशोभीकरणाचा ठराव दापोली : नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पाच विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. मोकळ्या जागेत सुशोभीकरणाचा ठराव बहुमताने मंजूर ...
सुशोभीकरणाचा ठराव
दापोली : नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पाच विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. मोकळ्या जागेत सुशोभीकरणाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. नगरपंचायत हद्दीत दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवून त्यांचा शासनाच्या निकषाप्रमाणे खर्च करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.
पंचायत समितीतर्फे मदत
रत्नागिरी : पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातर्फे तीन लाख रुपये व पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या इतर विभागांतर्फे दोन लाख रुपयांची मदत गोळा करून जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागासाठी वितरित करण्यात येणार आहेत. सभापती संजना माने यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
आरोग्यपथके कार्यरत
चिपळूण : तालुक्यात महापुराचे पाणी ओसरले असले तरी अद्याप चिखल सफाईचे काम सुरू आहे. परिसरातील पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे २० पथके शहरासह आजूबाजूच्या परिसरात कार्यरत केली आहेत. त्यामुळे या भागातील आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश येणार आहे.
आंदोलन स्थगित
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंशकालीन महिला परिचर महासंघातर्फे सोमवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आंदोलन रद्द करण्यात आले. रत्नागिरीसह सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग येथून आंदोलन स्थगित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
नवे शॉपिंग सेंटर उभारणार
रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथे नगर परिषदेचे शॉपिंग सेंटर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडा बाजार येथील जुन्या इमारती जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी तीन कोटी ३५ लाख रुपये खर्च करून नवी इमारत उभारली जाणार आहे. या अंदाजपत्रकाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.
रक्तदान शिबिर
साखरपा : येथील व्यापारी संघ कोंडगावतर्फे रक्तदान व रक्तगट चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती जयसिंग माने, सरपंच बापू शेट्ये, व्यापारी संघ अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांच्या उपस्थितीत झाले. वालावलकर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले.
मोफत जलनेती शिबिर
खेड : नाशिक योगविद्याधामच्या येथील शाखेतर्फे दोनदिवसीय जलनेती शिबिर आयोजित करण्यात आले होते. शाखेच्या संचालिका सुनीता जोशी, डॉ. मधुरा बाळ यांनी जलनेती म्हणजे काय? ती का करावी? व कशी करावी? याबाबत मार्गदर्शन केले. कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी एक महिना खेडसह परिसरात शिबिरले जाणार आहे.
घराघरांतून पोळीभाजी
चिपळूण : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मार्गताम्हाणे येथील घराघरांतून पोळीभाजी, भाकरी तयार करून युवकांतर्फे पाठविण्यात येत आहे. गेले पाच-सहा दिवस हा उपक्रम सतत सुरू आहे. याशिवाय पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे व खाद्यपदार्थांचे वाटप केले जात आहे. पाण्याच्या टाक्या भरून पाणीपुरवठाही उपलब्ध करून दिला जात आहे.
गीतगायन स्पर्धा
खेड : लोटे, रोटरी- रोटरॅक्ट व इनरव्हील क्लबतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या गटातील प्रथम तीन क्रमांकांना १,००१, ७०१, ५०१ रुपये रोख, तर दुसऱ्या गटात अनुक्रमे २,००१, १,००१ व ५०१ रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.