संपर्क युनिक फाऊंडशेनची ‘सामाजिक बांधीलकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:42+5:302021-09-22T04:34:42+5:30
रत्नागिरी : येथील संपर्क युनिक फाऊंडेशन या संस्थेतर्फे गेली चार वर्षे विविध सामाजिक कार्य सुरू आहेत. जिल्हा ...
रत्नागिरी : येथील संपर्क युनिक फाऊंडेशन या संस्थेतर्फे गेली चार वर्षे विविध सामाजिक कार्य सुरू आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील निधन झालेल्या मात्र काहींचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येत नसल्याने अशा मृतदेहावर अंत्यसंस्कार, दफनविधी करण्यासाठी संस्था सातत्याने पुढे येत आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळात ८५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, दफनविधी संस्थेतर्फे करण्यात आले.
अनंत चतुर्दशी दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६८ वर्षीय महिलेचे एका साधारण आजाराने निधन झाले. मात्र संबंधित महिलेचा मृतदेह नेण्यासाठी कोणीही नातेवाईक आले नाही, त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. रुग्णालयातील पोलीस चौकीतून एनजीओचे सल्लागार, नगरसेवक सुहेल मुकादम याच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली.
सुहेल मुकादम यांनी त्वरित संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांच्याशी संपर्क साधून अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यानंतर संबंधित महिलेचे दूरचे नातेवाईक रवींद्र महाडिक यांनीही त्वरित संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांच्याशी मोबाईलवरून माहिती देऊन सर्व सोपस्कार करून घेणेबाबत विनंती केली.
दिलावर कोंडकरी यांनी तातडीने संस्थेच्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह पांढरा समुद्र येथील स्मशानभूमीत नेण्यात आला. दिलावर कोंडकरी, इरफान शहा, शहानवाज बुड्ये, अबरार काझी, दिलावर होडेकर, जैद मजगावकर, युसुफ शिरगावकर यांनी स्वत: खांद्यावरून गोदामातून लाकडे आणून चिता रचली व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-------------------------------
मृतदेहावरील अंत्यसंस्काराचे काम एक सामाजिक भावनेतून केले आहे. संकटात असलेल्या लोकांना आम्ही नेहमी मदत करतो व यापुढे करतच राहणार. सामाजिक बांधीलकी जोपासत असताना, आम्ही कधीच जात-पात, धर्म पाहत नाही. माणुसकी हाच मोठा धर्म असून अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी सक्रिय राहणे आमचे ध्येय असून त्यासाठी सदैव कार्यरत राहू.
- दिलावर कोंडकरी, अध्यक्ष, संपर्क युनिक फाऊंडेशन, रत्नागिरी