साहित्य वादासाठी नाही, संवादासाठी
By Admin | Published: November 30, 2014 12:49 AM2014-11-30T00:49:07+5:302014-11-30T00:49:27+5:30
मसापचे जिल्हास्तरीय संमेलन : अध्यक्ष अशोक बागवे यांचे नेमाडे यांना प्रत्युत्तर
गुहागर : साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, हे या मातीत जन्मलेल्या केशवसुतांनी सांगितले आहे. अशा संमेलनावर टीका करणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे, अशा खोचक शब्दांत नाव न घेता मराठी साहित्य परिषदेच्या गुहागर येथील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे म्हणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना चोख उत्तर दिले. आजची पिढी ज्यात रमते ती इन्फर्मेशन म्हणजे फक्त माहिती आहे, ज्ञान नाही, असे सांगतानाच पुस्तके अमर आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
गुहागर पोलीस परेड मैदान येथे उर्विमाला साहित्यनगरीत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, कवी श्रीराम दुर्गे, इंद्रजित भालेराव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आरेकर, मसापच्या प्रतिभा लिमये, पत्रकार संघाचे सत्यवान घाडे उपस्थित होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आपल्या भाषणात त्यांनी पाच पसायदाने उलगडली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरांचे पसायदान आपल्याला माहितीच आहे. दुसरे पसायदान
संत तुकाराम महाराजांनी ‘हेची दान देगा देवा’ या अभंगातून मांडले. याच जिल्ह्यात जन्मलेल्या केशवसुतांनी ‘जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत’ या कवितेतून पसायदान मागितले आहे. बा. सी. मर्ढेकर यांनी ‘भंगू दे काठिण्य माझे’ या कवितेतून चौथे पसायदान, तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या कवितेतून पाचवे पसायदान मागितले आहे.
माहिती व ज्ञानामध्ये फरक आहे. आजची पिढी केवळ माहितीच्या पाठी धावत आहे; पण पुस्तक हे अमर आहे. क्षर होत नाही त्याला अक्षर म्हणतात. या अक्षराचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी साहित्य संमेलने झाली पाहिजेत, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मरणिका प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे व संजय गमरे यांनी केले. सकाळी ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)