खेडमध्ये संततधार सुरुच; महामार्गावर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:21+5:302021-06-17T04:22:21+5:30
खेड : खेड तालुक्यात बुधवार सकाळपासून पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभरात तालुक्यात ९२. ...
खेड : खेड तालुक्यात बुधवार सकाळपासून पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभरात तालुक्यात ९२. २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुक्यात आतापर्यंत ४४३.६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. महामार्गावरील भरणे नाका येथे मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाण्याचा शिरकाव झाला आहे.
महामार्गाच्या अर्धवट कामामुळे यंदा भरणे नाका परिसरात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये अत्यंत ढिसाळपणा झाल्याने यंदा भरणे नाक्याची पावसामध्ये अक्षरशः दैना उडाली आहे. गटारांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने या परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. काळकाई मंदिरासमोर मयूरेश्वर अपार्टमेंटकडे व गणेशनगरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला असून, या रस्त्यालगतच्या घरांमध्ये डोंगर उतारातून येणारे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.
लोकांच्या घरात पाण्याचा शिरकाव झाला तरी शासकीय यंत्रणा किंवा संबंधित ठेकेदार याठिकाणी फिरकलेले नाहीत. तालुक्यातील जगबुडी, नारंगी, चोरद या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. खेड शहरातील सखल भागातही पाणी साचले असून खेड - भरणे रस्त्यावरही पाणी तुंबले आहे.
चिखलच चिखल
मुंबई - गोवा महामार्गावर लवेल - दाभिळ फाटा या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तेथे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल आणि मोठ-मोठे खड्डे तेथे निर्माण झाले आहेत. वाहनचालकांना या अर्ध्या किलोमीटर परिसरातून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. बुधवारी भर पावसातच कल्याण टोलवेज कंपनीचे खड्डे भरण्याचे काम सुरू होते. यामुळे सुमारे एक तास दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.