जिल्ह्यात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:19+5:302021-07-14T04:36:19+5:30
रत्नागिरी : रविवार दुपारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी भरणे, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद पडणे आदी ...
रत्नागिरी : रविवार दुपारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी भरणे, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद पडणे आदी घटना घडल्या आहेत. संततधारेने राजापूर तालुक्यातील कोदवली आणि संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०४२.७० (सरासरी ११५.८६) मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून, सोमवारी एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
हवामान खात्याने दि. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली होती. शुक्रवारी व शनिवारी पावसाचे प्रमाण तितकेसे नव्हते. मात्र, रविवारपासून पावसाने झोडपायला सुरूवात केली आहे. रात्रीपासून जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंदविलेल्या २४ तासांच्या अहवालानुसार, राजापूर तालुक्यात सर्वाधिक १५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये १००पेक्षा अधिक आणि १३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद आहे. दापाेली आणि रत्नागिरीतही जाेरदार वृष्टी सुरू आहे.
गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे सोमवारीही राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, अर्जुना नदीपात्रातले पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. शीळ भागाकडे जाणारा रस्ताही जलमय झाला आहे. जवाहर चाैकात, बाजारपेठेत, ओणी - पाचल मार्गावर पाणी भरले आहे. दापोली मार्गावर फुरूसजवळ रस्त्यावर झाड पडल्याने दीड तास वाहतूक बंद होती, आता ती सुरळीत करण्यात आली आहे. गुहागर, खेड, रत्नागिरी आणि लांजामध्येही पावसाची संततधार कायम होती.