ठेकेदारी कामगार पगाराच्या प्रतीक्षेत
By admin | Published: December 16, 2014 10:03 PM2014-12-16T22:03:37+5:302014-12-16T23:39:26+5:30
आॅक्टोबर महिन्यात २५ दिवसांसाठी शहर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासाठी ठेकेदारी पद्धतीने ३० कामगार घेण्यात आले
चिपळूण : नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी ठेकेदारी पद्धतीने ३० कामगार घेतले होते. मात्र, डिसेंबर महिन्याची १५ तारीख उलटून गेली तरी हे कामगार पगारापासून वंचित राहिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
आॅक्टोबर महिन्यात २५ दिवसांसाठी शहर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासाठी ठेकेदारी पद्धतीने ३० कामगार घेण्यात आले. शहर सुंदर व स्वच्छ व्हावे, यासाठी या कामगारांनी परिश्रम घेतले. या कामगारांच्या जोडीला काही सेवाभावी संस्थांनीही योगदान दिले. प्रभागवार ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, डिसेंबर महिन्याची १५ तारीख झाली तरी हे ठेकेदारी कामगार पगारापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.
स्वच्छता अभियान कार्यक्रमात काम करणाऱ्या या कामगारांना वेळेत पगार देणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदार कामगारांना झुलवत असून, नगर परिषद प्रशासनाने याबाबत योग्य ती दखल घेऊन कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला देण्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)