युवा सेना पदाधिकारी - विनती कंपनी व्यवस्थापन यांच्यात बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:33 AM2021-08-15T04:33:02+5:302021-08-15T04:33:02+5:30
आवाशी : स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेण्यासाठी शनिवारी लोटे (ता. खेड) येथील विनती कंपनीत गेलेले खेड तालुका युवा ...
आवाशी : स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेण्यासाठी शनिवारी लोटे (ता. खेड) येथील विनती कंपनीत गेलेले खेड तालुका युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात जाेरदार बाचाबाची झाली. यावेळी एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप करत परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी लोटे पोलिसात दाखल झाले आहेत.
याबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटे पंचक्रोशी व खेड तालुक्यात उच्चशिक्षित तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेक तरुण शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. येथील तरुणांना नाेकरीत सामावून घेण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी शनिवारी लोटे येथील विनती ऑरगॅनिक कंपनीत व्यवस्थापनाची भेट घेण्यासाठी गेले हाेते. सुरुवातीला व्यवस्थापनाने भेट देण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र, काही वेळाने त्यांनी भेटीची तयारी दर्शवली. कंपनीने १० तरुणांना नोकरीत सामावून घेण्याचे कबूलही केले. मात्र, काहीच वेळात कंपनीने आमच्याविरोधात पोलिसात तक्रार दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही पोलिसात जाऊन आमचीही तक्रार घेण्याची लोटे पोलिसांना विनंती केली. मात्र, आमची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. हा विषय वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आला. त्यानंतर तब्बल दोन तासानंतर पोलिसांनी आमची तक्रार घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार तक्रार देण्याचे काम सुरु आहे. याचवेळी लोटे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम यांची प्रसारमाध्यमांनी भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता, दोघांच्याही तक्रारी घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
युवा सेनेतर्फे जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, खेड तालुका सचिव राकेश सागवेकर, आयटी सेल तालुका अधिकारी दर्शन महाजन, उपतालुका अधिकारी चेतन वारणकर, विभाग अधिकारी सौरभ चाळके, मच्छिंद्र गोवळकर, सुरज मोगरे, ओंकार चाळके, प्रसाद पाटणे, हर्षदीप आंब्रे, प्रणव ननावरे, मयूर आंब्रे, सुरज काते, अनिश आंब्रे, प्रसाद सावंत, संकेत हुमणे, शैलेश लाड, सुमित चव्हाण, आदित्य चिखले व नितीन चव्हाण उपस्थित होते. याप्रकरणी उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरु होते.