रत्नागिरी: बुरोंडीत गरबा नृत्य खेळण्यावरून वाद, दापोलीच्या प्रांताधिकाऱ्यांमुळे मोठा वाद टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:37 PM2022-09-30T18:37:14+5:302022-09-30T18:49:09+5:30
दापोलीचे प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला.
दापोली : गरबा नृत्य खेळण्यावरुन कोळी, खारवी समाजात जागेवरून वाद उफाळून आल्याची घटना दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे घडली. या वादानंतर कोळी समाजातील महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला.
बुरोंडी गावातील कोळी, खारवी या दोन समाजात मंदिरासमोरील पारंपरिक जागेतील नाचण्यावरून गेली २६ वर्ष वाद सुरु आहे. वादामुळे प्रांताधिकारी यांनी याठिकाणी नाचण्याची परवानगी रद्द केली आहे. मात्र, २८ रोजी कोळी बांधव गरबा खेळत असताना खारवी समाजाने हरकत घेतली. त्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी कोळी बांधवांचे गरबा साहित्य जप्त केले. तर काहींवर गुन्हेही दाखल केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ कार्यालयावर धडकले होते. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रांत अधिकारी शरद पवार यांनी दोन्ही समाजातील शिष्टमंडळाची चर्चा करून वादावर तोडगा काढला. त्यानंतर दोन्ही समाजाचे समाधान झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ निघून गेले.