जलशिवार योजनेवरुन वादंग
By Admin | Published: May 1, 2016 12:28 AM2016-05-01T00:28:15+5:302016-05-01T00:28:15+5:30
राजापूर पंचायत समिती : संतप्त सदस्यांकडून अनेक प्रश्नांची सरबत्ती
राजापूर : तालुक्यातील ५ गावांमध्ये सुमारे १ कोटी ५१ लाख रुपयांची ८५ कामे जलयुक्त शिवार योजनेतून झाली असल्याचे कृषी अधिकारी सांगत असतानाच दुसरीकडे मात्र त्या गावातील पाणीटंचाई कायम असल्याने त्याचे तीव्र पडसाद राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. संतप्त सदस्यांनी याबाबत विविध सवाल उपस्थित करुन कृषी विभागावर प्रश्नांची सरबत्ती केली.
सभापती सोनम बावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सर्व पंचायत समिती सदस्यांसहित अधिकारी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे अन्य काही खात्यांचे अधिकारी अनुपस्थित होते तर काही अधिकारी हे विलंबाने सभागृहात दाखल झाले. त्याबाबत उपस्थित सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे मासिक बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या व विलंबाने सभागृहात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपसभापती उमेश पराडकर यांनी दिला.
या मासिक सभेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. वाढता दुष्काळ लक्षात घेता यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. रस्त्यालगतच्या झाडांची जोपासणी करण्याची जबाबदारी ही त्या - त्या ग्रामपंचायतीवर देण्यात आली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी दिली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कामाच्या आराखड्यावरुन अधिकारी वर्गातच एकवाक्यता नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनाला आले. शासनाच्या शेष फंडातून ११ लाखांची तरतूद होऊन देखील अद्याप पाणी प्रश्नाशी संबंधित कामे मार्गी लागलेली नसल्याची माहिती सदस्यांनी दिली. तालुक्यातील अनेक नळपाणी योजना या अद्याप सुरु झाल्या नसल्याची माहिती देत सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा सर्व नळपाणी योजनांची तत्काळ चौकशी करावी व दोषींवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दीपक नागले व शिवाजी रबसे यांनी केली.
तालुक्यातील काही अंगणवाड्यांना अद्याप विद्युत पुरवठा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या अंगणवाड्या बंद असल्याची माहिती मासिक सभेत काही सदस्यांनी दिली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यामध्ये पाच गावे निवडण्यात आली असून, या गावांमध्ये या योजनेंतर्गत ८५ कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये खरवते ७, झर्ये ३३, ताम्हाणे ६३, मोरोशी २६ व कारवली १६ अशी कामे करण्यात आली असून, त्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये खर्च झाला असल्याची माहिती कृ षी अधिकारी चंद्रामणी मेश्राम यांनी सभागृहाला दिली.
दुसऱ्या टप्प्यात तालुक्यामध्ये करक, तळवडे व जवळेथर या तीन गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यातील तळवडे व करक या गावांमध्ये धरण प्रकल्प आहेत. मग सदर गावे ही जलयुक्त शिवार योजनेत कशी? असा सवाल उपस्थित सदस्यांनी केला. पण त्यावर अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर मिळू शकलेले नाही. त्यामुळे एकूणच तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षकांची कामगिरी रद्द : प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
३० एप्रिल रोजी सर्व शिक्षकांच्या कामगिरी रद्द केली जाणार आहेत. जर जास्त पटसंख्या व कमी शिक्षक एखाद्या शाळेत असेल तरच कामगिरी काढली जाईल, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. २०पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या तालुक्यातील १७६ शाळांबाबतची माहिती शासनाला देण्यात आली आहे. पण याबाबत अद्याप कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
कारवाई करा...
विद्यार्थी पटसंख्येवरुन वाद निर्माण करणाऱ्या जैतापूर - आगरवाडी व वाडाभराडे येथील मुख्याध्यापकांवर कारवाई करा, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले. कशेळी शाळा नं. ५ ला इयत्ता ७ वीचा वर्ग जोडण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचीही माहिती या सभेमध्ये देण्यात आली.