जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत प्रश्नकर्त्यांच्या विषयाची बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:05+5:302021-07-07T04:38:05+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत लोकशाही दिनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून थातूरमातूर उत्तरे देत आजचा लोकशाही दिन ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत लोकशाही दिनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून थातूरमातूर उत्तरे देत आजचा लोकशाही दिन उरकण्यात आला. नागरिकांनी सादर केलेल्या समस्यांचे निराकरण योग्य त्या संबंधित कार्यालयाकडून न करता तक्रारकर्त्यांच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबा ढोल्ये आणि जनजागृती संघाचे केशव भट यांनी केला.
लोकशाही दिन घेण्यात येणार असल्याची माहिती ऐनवेळी देण्यात आली तरीही जिल्हा प्रशासनाला आपल्या समस्या पूर्वनियोजित कळाव्यात म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ई-मेल द्वारे दाखल करण्यात आले. जनतेच्यावतीने समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी रत्नागिरी बसस्थानकाचे रेंगाळलेले बांधकाम आणि ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट अहवालाबाबत मागणी केली. जनजागृती संघाचे केशव भट यांनी टिळक आळी, रामनाका, आठवडा बाजार, गोखले नाका येथील पार्किंग व्यवस्था, समविचारी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांनी शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याबाबत, संगमेश्वर समविचारी तालुकाध्यक्ष यांनी रत्नागिरी देवरुख व्हाया पांगरी मार्ग रस्त्याच्या दुरवस्थेबाबत,यासह अन्य दोन विषय तर समविचारी युवा कोकण प्रमुख राजाराम गावडे यांनी समाजातील घरगुती महिला कामगारसह किराणा दुकानात काम करणारे घरोघरी माल देणारे यांना प्राधान्याने लसीकरण करावे, युवा प्रमुख नीलेश आखाडे यांनी लसीकरणात ७५ वर्षांवरील व्यक्तींना ताटकळत न ठेवता ऑफलाइन लसीकरण करावे, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी कोव्हिशिल्ड पहिला डोस घेतलेल्या, ज्या नागरिकांची नावे रजिस्टर नाहीत ती करावी. ओमकार फडके यांनी शहरासह ग्रामीण रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात प्रश्न केला. रिफायनरी संदर्भात जनतेच्या मागणीचा रेटा वरिष्ठ पातळीवर का दिला जात नाही, अशी विचारणा प्रमोद खेडेकर यांनी केली. तन्मय पटवर्धन, मयुर नाईक, ॲड. सोनाली जैन, सचिन रायकर, नितिन मोने, विनय देसाई, संदेश मायनाक, प्रवीण नागवेकर,जगदीश अपकारे, आविष्कार नांदगावकर,अमृत गोरे, या समविचारींनी सहभाग घेतला होता.
सर्व तक्रारकर्त्यांनी आगाऊ ईमेल करून हा विषय कोणत्या खात्याशी संबंधित आहे आणि त्या खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे, याचा स्पष्ट उल्लेख असूनही सरसकट संबंधित खात्याकडून उत्तर घेऊन कळविले जाईल, हे ठोकळेबाज उत्तर दिले जात होते. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी हजर नसणे ही बाब गंभीर होती. झूम मिटिंगला हजर राहून आपला कॅमेरा बंद ठेवणारे अधिकारी हे संतापजनक होते, अशी माहिती जनजागृती संघाचे केशव भट यांनी दिली.
समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी या लोकशाही दिनाबद्दल आपण कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. सादर केलेल्या निवेदनावर विषय कोणत्या विभागाशी सलग्न आहे, यासह अद्ययावत मसुदा बनविण्यासाठी ॲड.सूरज मोरे यांनी मार्गदर्शन केले.