साऱ्यांच्या सहकार्याने मुरूड समुद्र किनारा झाला चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:12+5:302021-09-25T04:34:12+5:30
दापोली : तालुक्यातील मुरूड येथील समुद्र किनाऱ्यावर मुरूड ग्रामपंचायत, दापोली पोलीस स्थानक, पंचायत समिती, दापोली नगरपंचायत, मुरूड येथील ग्रामस्थांनी ...
दापोली : तालुक्यातील मुरूड येथील समुद्र किनाऱ्यावर मुरूड ग्रामपंचायत, दापोली पोलीस स्थानक, पंचायत समिती, दापोली नगरपंचायत, मुरूड येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत स्वच्छता माेहीम राबवली. त्यामुळे मुरूड समुद्र किनारा चकाचक झाला आहे.
महापुरात नद्यांमधून कचरा वाहून येऊन दापोलीच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर पसरला आहे. यामुळे किनाऱ्यावर अस्वच्छता पसरली असून, यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे, तसेच गणपती विसर्जन झाल्यानंतर समुद्रातून फुले, तसेच विविध कचरा पाण्याच्या प्रवाहाने किनाऱ्याकडे फेकला जातो. यामुळे समुद्र किनाऱ्यावर प्रचंड कचरा निर्माण होऊन प्रदूषण होते. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियांतर्गत साफसफाई केली जाते. याच अभियानांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी मुरूड किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.
यावेळी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.एम. दिघे, सहपोलीस निरीक्षक नितीन ढेरे, दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, मुरूडच्या सरपंच सानिका नागवेकर, उपसरपंच सुरेश तुपे, सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.जी. बुरटे, एम.आर. चव्हाण, कॉन्स्टेबल जयश्री गोसावी, मंजू पाडावे, हर्णै दूरक्षेत्राचे अंमलदार दीपक गोरे, सुहास पाटील, कॉन्स्टेबल सुशील मोहिते, सुजित तळवटकर, हेडकॉन्स्टेबल भूषण सावंत, देवानंद बोरकर, मुरूड ग्रामपंचायत सदस्य रंजन पुसाळकर, अमित माने, सचिन पाटील, निधी जाधव, प्रशांत कांबळे यांच्यासह इतर सदस्य, ग्रामस्थ, पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.