सहकार पॅनेलचीच सत्ता
By Admin | Published: April 18, 2016 11:36 PM2016-04-18T23:36:24+5:302016-04-19T00:43:27+5:30
बाजार समिती निवडणूक : सर्व १८ जागांवर विजय, बंडखोरांचा धुव्वा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सर्व पक्षांनी बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न काँग्रेसच्या अंतर्गत नाराज गटाने बंडखोरी केल्याने निष्फळ ठरले. त्यामुळे रविवारी (१७ एप्रिल) १८ पैकी ११ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात बंडखोरांचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवित सहकार पॅनेलनी सर्वच जागांवर बाजी मारली. आता बाजार समितीचे अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बाजार समितीसाठी रविवारी जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी ९ वाजल्यांपासून शहरातील साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी १ वाजता सर्व निकाल जाहीर झाले. निवडणूक झालेल्या ११ ही जागांवर सर्वपक्षीय सहकार पॅनेलने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत ११२ मते अवैध ठरली आहेत. कृषी पणन, व्यापारी अडते, ग्रामपंचायत व सहकारी संस्था अशा चार मतदारसंघांतून ही निवडणूक घेण्यात आली. सहकारी संस्था मतदारसंघात सात ऐवजी आठजणांनी मतदान केले गेल्याने ७७ मते बाद झाली. उर्वरित मतदारसंघात १८ पैकी सात जागांवर आधीच बिनविरोध निवडणूक झाली होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक डॉ. राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. धुळप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कुमार देवरुखकर, दीपिका बने यांनी पूर्ण केली.
या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही सहकार पॅनेलनेच सर्व जागांवर बाजी मारली. त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात संजय आयरे यांना सर्वाधिक १३९४ मते मिळाली. या निवडणुकीत बंडखोरी करीत आव्हान निर्माण केलेल्यांना मतदारांनी चपराक दिल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
पराभूत उमेदवार असे
कृषी पणन मतदारसंघ :- जयवंत विचारे - ५३, चंद्रशेखर सिनकर - ३. व्यापारी अडते मतदारसंघ :- गजानन नंदाणे-३१ मते. ग्रामपंचायत मतदारसंघ :- निकिता पवार-१२ मते. सहकारी संस्था मतदारसंघ :- राजेश गुरव-१०१ मते.
बिनविरोध : गजानन पाटील, प्रकाश जाधव आणि मेघा कदम हे शिवसेनेचे उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादीचे सुरेश कांबळे आणि आशालता सावंत-देसाई तसेच काँग्रेसच्या विठाबाई कदम हेही निवडून आले आहेत.
सर्वांनी सहकार वाढवावा
सर्वजण एकत्र आल्यानंतर काय घडू शकते, हे बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आले. आता सर्व पक्षांनी मिळून सहकार वाढवावा, हीच आपली भूमिका असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे म्हणाले. बिनविरोध होऊ शकणाऱ्या या निवडणुकीत काही असंतुष्टांनी ‘खो’ घातला. मात्र, त्या सर्वांचा पराभव झाल्याने त्यांना चांगलीच चपराक बसली आहे. आता योग्य व लोकाभिमुख विजयी उमेदवारालाच पदे दिली जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विजयी उमेदवारपक्षमते
बिल्किस मुकादमभाजप१२६
कौस्तुभ केळकरभाजप३३५
हेमचंद्र मानेभाजप३२८
महेंद्र कदमशिवसेना८४७
संजय आयरेराष्ट्रवादी१३९४
अरविंद आंब्रेराष्ट्रवादी१३५८
अनिल जोशीराष्ट्रवादी१३६९
दत्तात्रय ढवळेराष्ट्रवादी१३५५
मधुकर दळवीकाँग्रेस१३५७
शौकत माखजनकरराष्ट्रवादी१३३५
माधव सप्रेराष्ट्रवादी१३२१