coroana in ratnagiri -कोरोनामुक्तांना निरोप देताना रूग्णालय हसलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 02:44 PM2020-04-25T14:44:51+5:302020-04-25T14:46:23+5:30
रूग्ण बरे होऊन घरी जाताना रूग्णांसोबतच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका खुश होतातच. पण निरोप द्यायला ते दारापर्यंत आले तर... त्यांनी जाता जाता पुष्पगुच्छ हातात ठेवला तर... सगळं वातावरणच बदलून जातं. आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातच असंच झालं.
रत्नागिरी : रूग्ण बरे होऊन घरी जाताना रूग्णांसोबतच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका खुश होतातच. पण निरोप द्यायला ते दारापर्यंत आले तर... त्यांनी जाता जाता पुष्पगुच्छ हातात ठेवला तर... सगळं वातावरणच बदलून जातं. आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातच असंच झालं.
कोरोनाबाधीत म्हणून ११ दिवस रूग्णालयात उपचार घेणारं सहा महिन्याचं बाळ आणि त्याच्या नातेवाईक असलेल्या दोन कोरोनाबाधीत महिला ठणठणीत बऱ्या होऊन घरी गेल्या आणि त्यांना निरोप देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका रूग्णालयाच्या दारापर्यंत आले आणि कोरोनाच्या भीतीच्या वातावरणातही जिल्हा रूग्णालय काही क्षण हसलं... गहिवरलं...!
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका महिलेला कोरोना झाला असल्याचे ७ एप्रिलला निष्पन्न झाले. त्यानंतर १0 एप्रिल रोजी त्या महिलेची नातेवाईक असलेल्या दुसºया महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी त्या महिलांचे नातेवाईक असलेल्या सहा महिन्याच्या एका बाळाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला होता.
इतक्या दिवसांच्या उपचारानंतर आता या तिघांचेही अहवाल निगेटीव्ह आले असल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. शुक्रवारी या बाळाचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला. दोन्ही महिलांचे अहवाल गुरूवारी निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. अशोक बोल्डे, बाळावर उपचार करणारे डॉ. दिलीप मोरे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका या साऱ्यांनी या कुटुंबाला टाळ्या वाजवून निरोप दिला. आणि कोरोनाच्या छायेतही जिल्हा रूग्णालय हसलं.