कोरोनाबाधित बालकांना मिळतोय ‘मामाच्या गावा’चा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:14+5:302021-06-18T04:22:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मोठ्या माणसांनी कोरोनाचा धसका घेतला असला तरीही अगदी अडीच ते तीन वर्षांच्या बालकांनी त्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मोठ्या माणसांनी कोरोनाचा धसका घेतला असला तरीही अगदी अडीच ते तीन वर्षांच्या बालकांनी त्यावर यशस्वी मात करत हेल्पिंग हॅण्डस या फोरमचा कोरोना योद्धा हा किताबही पटकावला आहे. सामाजिक न्याय भवन येथील कोरोना केअर सेंटरमधील या बालकांच्या विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘हेल्पिंग हँडस’च्या कार्यकर्त्यांमुळे हे केअर सेंटर म्हणजे त्यांना मामाचा गाव वाटू लागला आहे.
शहरातील सामाजिक न्याय भवन येथे सौम्य लक्षणे असलेल्या किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या रूग्णांना दाखल करण्यात येते. दुसऱ्या लाटेत माता - पित्यांसह त्यांची बालकेही बाधित होऊ लागल्याने अशांना शहरानजिकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार अडीच ते १५ वयोगटातील सुमारे २५ ते ३० बालके या केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. कोरोना म्हटलं की, मनाने स्ट्राॅंग असणारी व्यक्तीही हादरून जाते. मात्र, ही भीती या मुलांच्या गावीही नाही. या मुलांच्या या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घेण्यासाठी काहीतरी करायला हवं, हा विचार हेल्पिंग हॅण्डसचे सचिन शिंदे आणि त्यांचे सहकारी छोटू खामकर, अवधूत जोशी. सिद्धेश धुळप, सौरभ मुळ्ये आदींच्या मनात येताच तो अमलातही आणला गेला. त्याचदरम्यान हेल्पिंग हॅण्डसचे यापैकी काही कार्यकर्ते बाधित झाले. मग काय, त्यांच्यासाठी ही पर्वणीच. रात्री या बालकांसाठी कराओकेवर गाणी, विविध खेळ, विविध स्पर्धा सुरू झाल्या. मुलांसाठी चित्रकला आणि मोठ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. एवढेच नव्हे तर सहभागाचे प्रमाणपत्र आणि बक्षीसही देण्यात आले. या स्पर्धेला या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेल्पिंग हॅण्डसच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे केअर सेंटरचे वातावरण आल्हाददायी झाले आहे. त्यामुळे या मुलांना आपण जणू काही मामाच्या गावालाच आल्यासारखे वाटत आहे. बरे झालेल्या मुलांपैकी काहींनी तर आपल्याला आणखी दोन-तीन दिवस रहायचंय, असा हट्टही केला. या सेंटरमध्ये या उपक्रमांमुळे त्यांना आनंद देतानाच कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांना खंबीर करण्याचे काम या स्वयंसेवकांनी केले आहे. या सेंटरमधील बहुतांश मुले कोरोनाला हरवून ‘हेल्पिंग हॅण्डस’चा ‘कोरोना योद्धा’ हा पुरस्कार घेऊन आपल्या घरीही परतली आहेत. या सेंटरमध्ये उपक्रम करून त्यांना आनंद देतानाच, कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांना खंबीर करण्याचे काम या स्वयंसेवकांनी केले आहे.
निबंधांमधून भावना व्यक्त...
हेल्पिंग हॅण्डसने मोठ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात बहुतांश माता सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या निबंधात केअर सेंटरमध्ये असलेले आनंदी वातावरण, सामाजिक कार्यकर्ते गणेश धुरी यांची भोजन व्यवस्था आणि या स्वयंसेवकांच्या प्रामाणिक तळमळीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुलांसाठी विविध खेळसाहित्य...
सामाजिक न्याय भवन येथील केअर सेंटरमध्ये असलेल्या मुलांचा वेळ जावा, यासाठी हेल्पिंग हँडसच्या माध्यमातून कॅरम, बॅडमिंटन आदी खेळांचे साहित्य गोळा करण्यात आले. स्पीकर, कराओके आदीची सोय या केअर सेंटरमध्ये या स्वयंसेवकांनी उपलब्ध करून दिली आहे.
चित्रांतून संदेश
या बालकांनी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ‘वारंवार हात धुवा, कोरोनाला हरवा, स्टे होम, स्टे सेफ, आता मीच माझा रक्षक’ अशा बोधवाक्यातून सॅनिटायझर आणि मास्क वापरण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर कोरोना योद्ध्याच्या चित्रातून त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन...
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांच्या प्राेत्साहन आणि सहकार्याने शहरात विविध २८ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करतानाच कोरोना रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीला धावून जात आहेत. रत्नागिरीच्या या हेल्पिंग हॅण्डसचे कार्य महाराष्ट्रालाही प्रेरणादायी असेच आहे.