कोरोनामुळे शैक्षणिक कामकाजही थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:21+5:302021-04-19T04:28:21+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ...
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ते नववी व अकरावीच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर गुणांकन देण्याची सूचना केली आहे. अध्यापन बंद असले तरी अशैक्षणिक कामकाज मात्र सुरू होते; परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या अशैक्षणिक कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा मे व जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. अद्याप त्याबाबतही पुढील सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. पहिली ते चाैथीपर्यंतचे अध्यापन ऑनलाइन सुरू होते. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले होते. नववी व अकरावीच्या परीक्षा सुरू असतानाच शासनाने परीक्षा रद्द करून गुणांकनाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या, त्या शाळांमध्ये पेपर तपासणीचे काम सुरू होते. शिवाय पहिली ते नववी व अकरावीचे गुणांकन शाळा स्तरावर देण्याचे घोषित केल्याने शाळांमधून निकाल/गुणपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. वर्गनिहाय प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करण्यात येणार असून, १ मे पर्यंत निकाल घोषित करण्यात येणार होता; मात्र लाॅकडाऊनमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही शाळांमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे शाळांनी निकाल १ मे नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे घोषित केले असून, पालकांना त्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येण्यापूर्वी शाळा अध्यापनासाठी बंदचे आदेश आल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले आहे. त्यासाठी दररोज शिक्षक शाळेत येत असत. अध्यापनासमवेत गुणपत्रिकेचे काम सुरू होते; मात्र सद्यस्थितीत ऑनलाइन अध्यापन करण्यात येणार असून, गुणपत्रिका तयार करण्याचे कामही शिक्षक घरूनच करणार आहेत. शासनाकडून कडक संचारबंदी शिथिल केल्यानंतरच शिक्षक शाळेत येणार आहेत. त्यामुळे यावर्षीही परीक्षा रद्द झाली असली तरी गुणपत्रके मेच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून येणाऱ्या आदेशाची शाळांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २५७४ प्राथमिक शाळा, ४५४ माध्यमिक शाळा, १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत; मात्र सध्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ग तर अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असले तरी अन्य सर्व वर्गातील विद्यार्थी शासनाच्या पासच्या निर्णयामुळे निर्धास्त झाले आहेत.