गुढीपाडवा शुभेच्छांमधून कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:07+5:302021-04-14T04:29:07+5:30
कोरोना नामशेष होण्यासाठी अनेकांच्या प्रार्थना लोकमत न्यूज नेटवर्क टेंभ्ये : दरवर्षी जो विषय ‘ट्रेंड’मध्ये असेल, जो विषय त्या त्या ...
कोरोना नामशेष होण्यासाठी अनेकांच्या प्रार्थना
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभ्ये : दरवर्षी जो विषय ‘ट्रेंड’मध्ये असेल, जो विषय त्या त्या काळात अधिक चर्चेचा असेल, त्या विषयाला धरून सोशल मीडियावर संदेश पाठवले जातात. गतवर्षापासून कोरोनाने ठाण मांडले असल्याने प्रत्येक सणाच्या शुभेच्छांमध्ये कोरोनाचा उल्लेख येत होता. आता गुढीपाडवा व मराठी नववर्षही त्यातून सुटलेले नाही. यावर्षी मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छांबरोबरच कोरोनासंदर्भातील जनजागृती करणारे शुभेच्छा संदेशही मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत.
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज लाखो लोक या आजाराने बाधित होत आहेत. जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या संसर्गजन्य आजारातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे अनेक शुभेच्छा संदेश या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर दिले जात होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझरच्या वापराबरोबरच लसीकरणाचे महत्त्व सांगणारे देखील अनेक संदेश पाहायला मिळत होते.
राज्यामध्ये गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष या स्वरूपामध्ये अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा सण साजरा केला गेला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी आपला मित्र परिवार, आप्तेष्ट व नातेवाईकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिले जातात. यावर्षी या शुभेच्छा संदेशांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या शुभेच्छा संदेशांनी विशेष लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत होते.
‘गुढी उभारू स्वास्थ्याची !, लस टोचा, मास्क वापरा, उचित अंतर ठेवून वावरा, कोरोनाविरुध्द लढू, आरोग्याची गुढी उभारू !, चला आरोग्याची गुढी उभारून मानवरूपी देवांंना सहकार्य करू, आरोग्याचे सप्तरंग गुढीसोबत आकाशी उधळूदेत, नववर्षाची सुरुवात आरोग्यदायी होऊदे !’ यासारखे अनेक संदेश सोशल मीडियावरून प्राधान्याने दिले जात होते. काही लोकांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोरोना राज्यातून, देशातून हद्दपार व्हावा, अशीही प्रार्थना आपल्या संदेशातून केली आहे.