कोरोनामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:13+5:302021-05-08T04:34:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संकट असतानाही एस.टी. कर्मचारी जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना संकट असतानाही एस.टी. कर्मचारी जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत साळवी यांनी केली आहे. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.
बस व विश्रांतीगृहाचे स्वच्छ व निर्जंतुकीकरण सातत्याने केले जात नाही, याबाबत प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. चालक, वाहक व यांत्रिकी कामगार यांच्या कोविड तपासणी किंवा लसीकरण याबाबतीत वेळीच योग्य नियोजन केलेले नाही. मध्यवर्ती कार्यालयाच्या कामगिरी लावताना रोटेशन पद्धतीने लावून सर्वांना सारखे काम व संक्रमणापासून बचाव होईल असे नियोजन करणे आवश्यक असताना, तसे नियोजन न करणे. उपस्थिती मर्यादित ठेवाव्यात अशा सूचना असतानाही चालक, वाहक यांना हजेरीसाठी आगारात बोलावणे. विभागीय कार्यशाळा, विभागीय कार्यालय व आगारस्तरावरचे यांत्रिक कर्मचारी यांचे चुकीचे नियोजन करून गर्दी एकत्र करणे. अत्यावश्यक सेवा म्हणून काम सुरू ठेवणे अशा सूचना असतानाही शिवशाही प्रशिक्षण ही बाब आत्ताची तातडीची नसताना कामगारांना बेकायदेशीर एकत्र करणे. समय वेतनश्रेणी, तात्पुरती समय वेतनश्रेणी, रोजंदारी चालक-वाहक अशी गटवारी असून सामान्य परिस्थिती असताना, त्यांना कामगिरी लावण्याची आपल्याकडे प्रचलित पद्धत आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या तशा सूचना नसताना चुकीच्या, बेकायदेशीर, शासनाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात व उद्देश विचारात न घेता कामगिरीचे चुकीचे नियोजन करून तात्पुरती समय वेतनश्रेणी व रोजंदारी गटातील कामगारांना कामगिरी न लावून कामगारांची उपासमार होईल अशी अमानवी कार्यप्रणाली राबविण्यात येते.
राज्यातील इतर विभागांपेक्षा आपल्या विभागात वेगळी कार्यप्रणाली राबवून कामगारांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने आर्थिक मदत करूनही आगार व्यवस्थापकांनी चुकीचे अहवाल तयार करून कोरोना कालावधीतील कामगारांना पगार आजपर्यंत न मिळू देणे आदी सर्व बाबी अतिशय महत्त्वाच्या व योग्य वेळी सोडविण्याच्या असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विनाविलंब कार्यप्रणालीत बदल व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.