कोरोनामुळे बदलले घराघरांतले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:28+5:302021-06-16T04:41:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन ...

Corona changed home kitchens; Healthy foods increased | कोरोनामुळे बदलले घराघरांतले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

कोरोनामुळे बदलले घराघरांतले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन करण्याकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर तेलकट, बेकरी उत्पादनासह, फास्टफूड टाळण्यात येत असून प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ आवर्जून सेवन करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे मुले घरी आहेत. ५० टक्के उपस्थितीमुळे नोकरदार पालकही बहुतांशवेळा घरी असतात. कोरोनाची भीती सर्रास सर्वांना वाटत असल्याने मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पार्सल सुविधा उपलब्ध होत असली तरी बाहेरून अन्न मागविणे आवर्जुन टाळण्यात येत आहे. त्यामुळेच घरातच पौष्टिक पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जात आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

तेलकट, तुपाचे, मैदायुक्त बेकरी उत्पादने टाळून भाजी-भाकरी, पोळी भाजी खाण्याचा विशेष आग्रह राहत आहे. पालेभाज्यांना तर सर्वाधिक मागणी होत आहे. भाकरीमध्ये नाचणीला विशेष पसंती होत आहे.

मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी, नाचणीचे सत्त्व, फळांचे आवर्जून सेवन केले जाते. फास्टफूड ऐवजी नाष्ट्याला मुलांना मिश्र डाळींचे धिरडे, चटणी, अप्पे, मधल्या वेळेसाठी पौष्टिक लाडू देण्यात येत आहेत.

लिंबूवर्णीय फळांबरोबर खजूर, सुका मेवा, शेंगदाणा, गुळाचे सेवन करण्यात येते. पावसाळ्यातील गारव्यामुळे मेथी, डिंक, खारीक वापरून लाडू, वड्या तयार करण्यात येतात. एकूणच परिपूर्ण आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळविण्यावर अधिक भर आहे. यामुळे मुलांचे अन्य खाणे कमी झाले आहे.

वेळेवर जेवणाची सवय

लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित असल्याने ताजे व गरम अन्न एकत्र बसून जेवणाची सवय लागली आहे.

वाफवलेली कडधान्य वापरून आवश्यक भाज्या, फळांचे कापासह चाट सेवन करण्यात येत आहे.

ताज्या अन्नामुळे प्रतिकार शक्ती वाढते शिवाय घरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही सुधारली आहे. परिपूर्ण आहार घेण्यात येत असल्यामुळे अनेकांच्या आरोग्याबाबत छोट्या मोठ्या तक्रारी मात्र कमी झाल्या आहेत.

कोरोनामुळे मुले घरी आहेत. त्यामुळे दररोज गरम व ताजे अन्न खाण्याची सवय लागली आहे. चमचमीत पदार्थांपेक्षा पौष्टिक व सकस पदार्थ करून वाढण्यात समाधान आहे. बाहेरून तेलकट खाद्यपदार्थ आणणे बंद केले आहे. त्यामुळे मुलांनाही घरचेच अन्न आवडू लागले आहे.

- अर्चना बापट,

ताज्या अन्नाबरोबर फळे खाण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. सकाळचा नाष्टा, दोनवेळचे जेवण असो व मधल्या वेळचे खाणे यासाठी घरातच तयार करून देण्यात येत आहे. अन्य स्नॅक्स विकत आणून खायची सवय यामुळे मोडली गेली आहे. घरच्या अन्नाची गोडी लागली आहे.

- उज्ज्वला पाटील

गेल्या दीड वर्षात फास्टफूडकडील मुलांचा ओढा आपोआप कमी झाला आहे. मुलांनाही घरच्या अन्नाचे महत्त्व कळले असून चवही समजली आहे. भाज्या, कडधान्ये, फळे खाण्याची सवय लागली आहे. नाष्ट्यासुध्दा वेळेवर होत आहे. बेकरी उत्पादने खाण्याचे मुले आता टाळू लागली आहेत.

- प्रज्ञा खेडेकर

Web Title: Corona changed home kitchens; Healthy foods increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.