कोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:59 PM2020-06-27T15:59:21+5:302020-06-27T16:00:40+5:30
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.
रत्नागिरी : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण जतन करण्यासाठी तापमानातील वाढ, हवामान ऋतूबदल यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०१६ साली ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर केली. यात पहिल्या वर्षी २०१६ - १७ या सालाकरिता राज्यासाठी एकाच दिवशी २ कोटीचे उद्दिष्ट होते.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ लाख ६४ हजार लागवडीचे उद्दिष्ट होते. १ ते ३१ जुलै या कालावधीत हे उद्दिष्ट ओलांडून पहिल्याच वर्षी जिल्ह्याने दोन लाख पाच हजार (१२४ टक्के) वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग आदी विविध यंत्रणांच्या सहाय्याने उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली.
सन २०१७ - १८ करिता राज्याला ४ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याला ३ लाखांचे उद्दिष्ट होेते. यावर्षीही जिल्ह्याने सर्व यंत्रणांच्या सहकार्याने उद्दिष्ट ओलांडून ३ लाख ८० हजार (१२६ टक्के) लागवड केली. २०१८ - १९ साली राज्याला १३ कोटींचे, तर जिल्ह्याला २० लाख ५४ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावेळीही जिल्ह्याने उद्दिष्ट ओलांडून २२ लाख ३७ हजार (१०९ टक्के) वृक्षलागवड केली.
२०१९ - २० साली राज्याच्या ३३ कोटी उद्दिष्टापैकी जिल्ह्याला ४८ लाख ६३ हजारांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्याने ५७ कोटी ७२ लाखांचा (११८.६९ टक्के) टप्पा गाठला. शेवटच्या पाचव्या वर्षी राज्याने ५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, यावर्षी कोरोना संकट फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.
त्या जागा भरायला हव्या
निसर्ग चक्रीवादळात दापोली, मंडणगड, गुहागर येथे अनेक शासकीय जागेतील वृक्ष कोलमडून पडले आहेत. तसेच चौपदरीकरणाच्या कामामुळे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गही ओसाड होऊ लागला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची योजना राबविताना तुटलेल्या झाडांच्या ठिकाणी लागवड करून ती झाडे जगवल्यास योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल.
यंदा पाचवे वर्ष
२०१६ साली योजना सुरू होता पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी, तिसऱ्या वर्षी १३ कोटी, चौथ्या वर्षी ३३ कोटी आणि शेवटच्या पाचव्या वर्षी ५० कोटींचे उद्दिष्ट होते.
रत्नागिरी जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती
जिल्ह्याला पहिल्या वर्षी १ कोटी ६४ लाख, दुसऱ्या वर्षी ३ लाख, तिसऱ्या वर्षी २० लाख ५४ हजार, तर चौथ्या वर्षी ४८ लाख ६३ हजार असे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने एकूण ७३ लाख ८१ हजार एवढे उद्दिष्ट ओलांडून ८५ लाख ९४ (११६.४३ टक्के) वृक्ष लागवड केली आहे.