मासे निर्यातीवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:20+5:302021-05-30T04:25:20+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातून सुरमई, सरंगा, पापलेट, बांगडा, कोळंबी, आदींची केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असली, ...
रत्नागिरी जिल्ह्यातून सुरमई, सरंगा, पापलेट, बांगडा, कोळंबी, आदींची केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असली, तरी गेले वर्षभर कोरोनाने निर्यातीवरही बंधने आली होती. त्यामुळे निर्यातदार छोट्या-मोठ्या कंपन्यांसमोर आर्थिक संकट घोंघावत आहे. मासे निर्यात होण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांवर झाला असल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर बँकांच्या कर्जाचे बोजे वाढतच चालले आहे. तसेच वाहनचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट मासेमारी व्यवसायाला डोके वर काढू देत नसल्याने मासेमारीशी संलग्न असलेले इतर जोडधंदेही उद्ध्वस्त झाले आहेत. पानटपऱ्या, छोटे टेम्पो, रिक्षा व्यावसायिक तसेच छोट्या हॉटेल व्यावसायिकांचा मासेमारी व्यवसायावर खऱ्या अर्थाने व्यवसाय सुरु होता. मात्र, मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यासमोरही पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे कोरोनाने आर्थिक नाडीच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. त्याचे परिणाम खोलवर झाल्याचे दिसून येत आहेत.
माशांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेला मच्छी व्यवसाय कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यात सापडलाय. तरीही आपल्या जीवावर उदार होऊन दर्यावर स्वार होणाऱ्या या दर्याच्या राजाची संकटातून कशी सुटका होणार, या चिंतेत सापडला आहे.