कोरोना संकटाबरोबरच आता जिल्हावासीयांना पुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:53+5:302021-06-09T04:38:53+5:30
रत्नागिरी : यावर्षी पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून सुरू होतानाच आता येत्या १९ ...
रत्नागिरी : यावर्षी पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून सुरू होतानाच आता येत्या १९ जूनपासून पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
रत्नागिरी, चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर या सहा तालुक्यांमधील एकूण ३१ गावे पूरप्रवण गावे म्हणून घोषित करण्यात आली असून ४५ दरड प्रवण गावे आहेत. अतिवृष्टीत या गावांमध्ये पूर येण्याचा तसेच दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा गावांमधील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात महामार्गावर काही घाटांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. त्यादृष्टीनेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांनाही कचऱ्यामुळे पाणी तुंबणार नाही, यासाठी शहरांमधली गटारे उघडी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात संभाव्य आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही कार्यरत राहणार आहे.
अग्निशमन यंत्रणा सज्ज
जिल्ह्यात आतापर्यंत स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नव्हती. मात्र, गेल्या वर्षी एम. आय. डी. सी. स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते.
पावसाळ्यात काही वेळा आपत्ती आल्यास जिल्ह्यातील खासगी कंपन्यांची तातडीने मदत घेण्यात येते.
रत्नागिरीतही जे. एस. डब्ल्यू, फिनोलेक्स या कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेचे नेहमी सहकार्य मिळते.
धोकादायक इमारती आणि झाडेेेे....
रत्नागिरीत ८९ आणि चिपळूण शहरात सुमारे ३० धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन या इमारतींना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील धोकादायक झाडे कोसळून आपत्ती आल्यास ते झाड हटविण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
धोकादायक इमारती, झाडे कोसळून जीवितहानी अथवा अन्य नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश सर्व पालिका आणि तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सावित्री, वसिष्ठी, शास्त्री, कोदवली, वाघोटण आदी प्रमुख पाच नद्या असून त्यांच्या सहा उपनद्या आहेत. अतिवृष्टीत या नद्यांना पूर आल्यास परिसरालगतच्या गावांतील लोकांना धोका निर्माण होतो. नदीलगत असलेली ३१ गावे पूरग्रस्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्ती तसेच अन्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्व यंत्रणांचा समावेश आहे. आपत्तीच्या स्वरूपावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित यंत्रणेला माहिती देऊन तातडीच्या मदतकार्यासाठी पाचारण केले जाते.