कोरोना, तौक्तेने मच्छीमार बुडाले आर्थिक खाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:57+5:302021-05-21T04:32:57+5:30
वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. ...
वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे मच्छीमार, आंबा बागायतदारांचे नुकसान हे सर्वांसाठीच तोट्याचे ठरणारे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण हे या दोन्ही व्यवसायांवर असल्याने वादळ वाऱ्याचा फटका इतर व्यवसायांनाही बसला आहे. या व्यवसायांशी जोडधंदे आज कोरोनामुळे बंद अवस्थेत असले तरी लॉकडाऊन उठल्यानंतर सुरू होणाऱ्या इतर व्यवसायांवर होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण हे दोन्ही व्यवसाय बुडाल्याने इतर व्यवसायांना घेऊन बुडणार हे निश्चित आहे.
कोरोनामुळे या दोन्ही व्यवसायांना जबर फटका बसलेला असतानाच ताैक्ते वादळाने त्यांना अडचणीत आणले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये छोटीमोठी वादळे येऊन गेली आणि त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार भरडला गेला. यंदाचा मासेमारी हंगामही मच्छीमारांसाठी तोट्यातच गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खराब हवामानामुळे मच्छीमारी अडचणीत असतानाच वादळाने त्यांच्या अडचणीत आणखीच भर घातली. त्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. तौक्ते वादळामुळे आजही वातावरणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. अजूनही वातावरण खोल समुद्रातील मासेमारीसाठी धोकादायक असल्याने मच्छीमार भीतीच्या छायेत वावरताना दिसून येत आहे. त्यामुळेच आजही सुमारे ३५०० नौका किनारी नांगरावर उभ्या आहेत. त्यातच अनेक नौका वादळामुळे एकमेकांवर आदळून आपटून नुकसानग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून हे न भरून येणारे आहे. कारण आजपर्यंत झालेल्या वादळामध्ये मच्छीमार तसेच बागायतदारांना किती प्रमाणात नुकसानभरपाई शासनाकडून मिळाली, हे न सांगणाइतके आहे. कोणाचेही शासन असो मच्छीमार, बागायतदार हे मदतीच्या प्रतीक्षेत राहणार, ही व्यथा सांगणार कोणाला, असेच म्हणावे लागेल.
- रहिम दलाल