कोरोनामुक्त माझे गाव सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:53+5:302021-05-08T04:32:53+5:30
दुरांतो एक्स्प्रेस रद्द खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ स्पेशल रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या असतानाच, ...
दुरांतो एक्स्प्रेस रद्द
खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ स्पेशल रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या असतानाच, दि. ८ मेपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी लोकमान्य टिळक-एर्नाकुलम दुरांतो स्पेशल रद्द करण्यात आली आहे. दि.२९ जूनपर्यंत दुरांतो एक्स्प्रेस रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
काजू कलमे खाक
राजापूर : तालुक्यातील आंगले जांभळी तिठा येथे लागलेल्या वणव्यात दहा एकरचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. यामध्ये या परिसरातील काजू कलमे खाक झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या वणव्यामुळे सुकलेले गवत, पालापाचोळा पेटला, शिवाय वाऱ्यामुळे आग भडकत गेली.
माहिती पाठविण्याचे आवाहन
चिपळूण : जिल्ह्यातील भारत-चीन, तसेच पाकिस्तान युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिकांची माहिती एकत्रित करून, ती सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडे दि.१५ एप्रिलपर्यंत पाठविण्यात येणार असल्याने, याची माहिती देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
व्याजमाफीची मागणी
राजापूर : लॉकडाऊनमुळे व्यापारी व व्यावसायिकांच्या कर्जावरील व्याज बँकांनी माफ करावे व या कालावधीत सवलत मिळावी, अशी मागणी तालुक्यातील व्यावसायिक, व्यापारी करीत आहेत. व्यवसाय बंद असल्यामुळे उत्पन्न ठप्प झाले आहे. परिणामी, हप्ते भरणे अशक्य झाल्याने व्यावसायिकांनी व्याजमाफीची मागणी केली आहे.
पाणीटंचाईची समस्या मार्गी
खेड : तालुक्यातील चोरवणे जखमेवाडीतील ग्रामस्थांना दरवर्षी सतावणारी पाणीटंचाईची समस्या लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत कायमचीच निकाली निघाली आहे. या वाडीसाठी राबवण्यात आलेल्या पाणी प्रकल्पाचे ऑक्टोबर महिन्यात लोकार्पण झाले. यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण कायमचीच थांबली आहे.
एकेरी वाहतुकीमुळे कोंडी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. आधीच दोन्ही बाजूंकडून एकेरी मार्गाचा अवलंब व विशेषत: अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होत आहे. त्यातच आंबवलीच्या दिेशने जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विजेची व्यवस्था
देवरूख : देवरूख नगरपंचायतीकडून चर्मालय स्मशानभूमीत पथदीपला मंजुरी देण्यात आली आहे. देवरूख नगरपंचायत प्रभाग क्रमांक ८, ९, १० येथील चर्मालय स्मशानभूमीत विजेची सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. युवासेना उपशहरप्रमुख तेजस भाटकर यांनी दिलेल्या निवेदन व पाठपुराव्याला यश आले आहे.
स्वच्छता मोहीम
चिपळूण : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आवारातील स्वच्छतागृहाला झाडे-झुडपे, वेलींनी वेढले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी आगार प्रशासनास निदर्शनास आणून दिल्यानंतर, आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी परिसरात सफाई कर्मचाऱ्यांतर्फे स्वच्छता करण्यात आली.
रस्त्याची दुरवस्था
खेड : तालुक्यातील पन्हाळेकाझी येथील जागतिक वारसास्थळ असलेल्या पांडव व बौद्धकालीन कोरीव लेणी मूलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. या गावाला जोडणाऱ्या पर्यटनस्थळाच्या घाट रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. लाठीमाल-तेरेवायंगणी गावराई ते पन्हाळेदुर्ग कोरीव लेण्यांपर्यत येणारा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे.