देव-भक्तांच्या भेटीला ‘कोरोना’चा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:20+5:302021-03-27T04:32:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापाेली : कोकणात शिमगोत्सवाला देव भक्तांच्या भेटीला पालखीतून येण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. मात्र, काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापाेली : कोकणात शिमगोत्सवाला देव भक्तांच्या भेटीला पालखीतून येण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. मात्र, काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे ही परंपरा यावर्षी खंडित झाली असून, भक्तांचा हिरमोड झाला आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही असणारा कोकणी माणूस गणेशोत्सव व शिमगोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी म्हणजे कोकणात येताेच. काेकणातील उत्सवाची पारंपरिक प्रथा खंडित होऊ देत नाही. शिमगोत्सवात घरी पालखी येणार म्हणून त्याची संपूर्ण ओढ गावाकडे असते. कोकणात प्रत्येक घरी देवाची पालखी घेऊन जाण्याची प्रथा असून, हा योग केवळ वर्षातून एकदाच शिमगोत्सवामध्ये येतो. घरी पालखी येणार म्हणून भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. अंगण सारवले जाते, घराची साफसफाई, रंगरंगोटी केली जाते. तसेच माहेरवाशिणी शिमगोत्सवामध्ये देवीची ओटी भरण्यासाठी माहेरी येतात. देवीची पालखी सहाणेवर बसवली जाते. या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन देवीची पूजा करतात, ओटी भरली जाते, नवस बोलले जातात. होम पेटतो. त्या दिवशीसुद्धा गावकरी सर्वजण एकत्र येतात. गावातली पालखी दुसऱ्या गावात, तर दुसऱ्या गावातली पालखी तिसऱ्या गावात, असा पालखी भेटीचा अनोखा सोहळा यानिमित्त पाहायला मिळतो.
शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने शासनाने उत्सव साजरा करण्यासाठी काही निर्बंध लादले आहेत. नियमांचे पालन करून शिमगोत्सव सुरू आहे. काही गावात ठराविक मंडळींच्या उपस्थितीत पालखी फिरवली जात आहे. मात्र ज्या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये पालखी भक्ताच्या भेटीला जाणार नाही. काही ठिकाणी पालखी उत्सव माेजक्याच लाेकांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. प्रशासनाने पालखी घराेघरी नेण्यास बंदी घातल्याने यावर्षी देव भक्तांच्या भेटीला येणार नसल्याने अनेकांचा हिरमाेड झाला आहे.