चिपळुणातील १७ गावे कोरोना ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:14+5:302021-05-28T04:24:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यातील ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यातील ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने तब्बल १७ गावांना कोरोना ‘हॉटस्पॉट’ जाहीर केले आहे. यामध्ये गावांमधील विविध वाड्यांचा समावेश आहे. शहरातील मार्कंडी येथील केवळ एक तुलसी अपार्टमेंट ‘हॉटस्पॉट’ ठरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने तालुक्यात सद्यस्थितीत ६७१ रूग्ण उपचार घेत आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात बाधित रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी येथील प्रशासन व आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देत आहे. मात्र, ग्रामीण भागातील रूग्णसंख्येचा आलेख चढता राहिल्याने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सुरूवातीला सात गावे कोरोना ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करून तेथे कडक निर्बंध लावले होते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने तालुक्यातील १७ गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये पिंपळी खुर्द, चिंचघरी, पिंपळी बुद्रुक, पेढांबे, पेढे, पोफळी, वालोपे, शिरगाव, सावर्डे, खेर्डी, खडपोली, अलोरे, कापसाळ, कामथे बुद्रुक, मुर्तवडे, वहाळ या गावांचा व त्या अंतर्गत असणाऱ्या अनेक वाड्यांचा समावेश आहे तर शहरातील मार्कंडी येथील केवळ एक अपार्टमेंट कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरली आहे.
गेल्या आठवडाभरात तालुक्यात २०४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. दररोज तीस ते पस्तीस रूग्ण आढळून येत असले, तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने रूग्णसंख्येत घट झालेली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६७१ ॲक्टिव्ह रूग्ण असून, त्यापैकी ४४५ गृह अलगीकरणामध्ये आहेत तर १५ जणांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एकीकडे रूग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आत्तापर्यंत ३१५ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे तर एकूण ८ हजार २०९ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ७ हजार २२३ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.