कोरोना संसर्ग - फुफ्फुसांचे आरोग्य...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:24+5:302021-05-16T04:30:24+5:30

कोरोना संसर्ग नकोच नको. त्यासाठी आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य उत्तम हवे. वैद्यकीय संशोधनामधून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास ...

Corona Infection - Lung Health ...! | कोरोना संसर्ग - फुफ्फुसांचे आरोग्य...!

कोरोना संसर्ग - फुफ्फुसांचे आरोग्य...!

Next

कोरोना संसर्ग नकोच नको. त्यासाठी आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य उत्तम हवे. वैद्यकीय संशोधनामधून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या फुफ्फुसाच्या आरोग्य तपासणीसाठी घरच्या घरी ‘सहा मिनिटे चाला’ याची चाचणी सांगितली आहे. आपल्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तर या चाचणीचा जनजागरणासाठी, त्यांची भीती कमी करण्यासाठी आणि वेळेत कोविड - १९चे योग्य उपचार घ्यावेत, यासाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. एक चांगला उपक्रम म्हणून आपण त्याची नोंद घेऊया.

ताप, सर्दी, खोकला, वास न येणे, थकवा जाणवणे, श्वास किंवा धाव लागणे, घरीच आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करु शकतात. ह्या चाचणीसाठी ऑक्सिमीटर आवश्यक आहे. ही चाचणी करताना हात स्वच्छ पुसून कोरडे करावे. नंतर पाच मिनिटे स्वस्थ बसावे. नंतर आपला हात छातीच्या जवळ हृदयाच्या ठिकाणी स्थिर ठेवूया. ऑक्सिमीटर सुरु करुया. त्यासाठी तो तर्जनी किंवा मधल्या बोटात ठेवूया. आता ऑक्सिजनची नोंद करुया. आता ते बोटात ठेवून मध्यमगतीने चालूया. सहा मिनिटे चालून झाल्यावर जर ऑक्सिजनची पातळी कमी झाली नाही तर आरोग्य उत्तम समजूया. ९२ टक्केपेक्षा कमी असेल किंवा ३ टक्क्यांनी चालणे सुरु करण्यापूर्वीच कमी झाली असेल तर किंवा धाप लागली असेल तर ऑक्सिजनची पातळी कमी समजून त्याला डॉक्टरी सल्ला आणि रुग्णालयीन मदतीची, भरतीची आवश्यकता असेल, लक्षणे असतील त्याप्रमाणे गरज भासेल. ज्यांना बसल्या जागीच धाप लागत असेल, त्यांनी ही चाचणी करु नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीने ३ मिनतटे चालूनही नक्की ऑक्सिजनची पातळी लक्षात येते. दिवसातून तीनवेळा ही चाचणी करावी. यात तफावत वाटली तर लगेच डॉक्टरी सल्ला घ्यावा.

अशा ऑक्सिजन पातळीसाठी आरोग्य मंत्रालयाने पोटावर झोपून श्वसनाचा व्यायाम करावा, हे सांगितले आहे. त्याला प्रोनिंग (PRONING) असे नाव दिले आहे. आपल्या २५/१०/२०२०च्या फिटनेस फंडा - कोरोना उपचारक प्राणवायूसाठी आपण हा व्यायाम सुचवला होता. योगाच्या पद्धतीत यात थोडा फरक आहे, त्याला ‘भालासन’ असे म्हणतात. यामुळे फुफ्फुसातील खालच्या भागातील अ‍ेरिओल्स (हवेच्या छोट्या-छोट्या पिशव्या) चांगल्याप्रकारे ऑक्सिजनचा साठा करतात. जिवनाला सुरळीत ठेवतात. साधारण ३० मिनिटांपेक्षा ‘PRONING’ जास्त करु नये. शरिरातील ऑक्सिजनचा स्तर ९३पेक्षा खाली गेला तर कृत्रिम ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत हा व्यायाम रुग्णाला प्राणपूरक जीवनदायिनी ठरतो. यात रुग्णाच्या मानेखाली उशी द्यावी तसेच त्याच्या पोटाखाली आणि पायाखाली दोन उशा ठेवाव्यात. अशास्थितीत रुग्णाला सतत श्वास घ्यायला प्रेरणा देऊया. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यास मदत होईल किंवा पूर्ववत होईल. जेवल्यानंतर लगेच किंवा गरोदर स्त्रियांनी प्रोनिंग करु नये, अशी सक्त ताकीद आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये तरुणांमध्ये ‘हॅप्पी हाय फॉक्सिया’ नावाची लक्षणे दिसतात. यात अशक्तपणा आणि ऑक्सिजनची पातळी अचानक कमी होते आणि चक्कर येतात. म्हणूनच अशासाठी लगेच चाचणी करुन उपचाराकडे वळावे. अर्थात अशी वेळच येऊ देऊ नये, म्हणून मास्क वापरा, वारंवार हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा आणि पुरेशा प्रतिकारकतेसाठी लसीकरण करुन घ्या. भीती बाळगू नका नका, विश्वासाने राहा. पण तरीही ही त्रिसुत्री वापराच... (क्रमश:)

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी

Web Title: Corona Infection - Lung Health ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.