जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्थानकात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 02:23 PM2020-07-22T14:23:51+5:302020-07-22T14:24:53+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ३७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १,३३६ झाली आहे़.
रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी ३७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १,३३६ झाली आहे़.
या अहवालामध्ये रत्नागिरीजिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी दिवसभरात ३७ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने रुग्णांची संख्या १,३३६ वर जाऊन पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये खेडमधील कळंबणी येथील १ रुग्ण, चिपळुणातील कामथे येथील १५ रुग्ण आणि रत्नागिरीतील १२, दापोलीतील ४, गुहागरातील १ आणि घरडामधील ३ रुग्णांचा समावेश आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कार्यालयातील एक प्रमुख विभागातील हा कर्मचारी असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. या अहवालानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्याचबरोबर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्याचा अहवालही मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी स्वॅब दिले होते. त्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या महिला कर्मचाऱ्यामध्ये कोणतीच लक्षण दिसत नसताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस हादरून गेले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये वाटद खंडाळा परिसरातील २, झारणी रोड येथील १, जुना माळनाका येथील डॉक्टर, फिनोलेक्स कॉलनीतील १, आरोग्य मंदिर येथील २, नाटे येथील १, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी १ आणि खासगी रुग्णालय १ डॉक्टर आणि १ परिचारिका कोरोनाबाधित सापडली आहे.