मांडकीतील पाचजणांचा कोरोनाने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:20+5:302021-04-26T04:28:20+5:30
चिपळूण : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या तालुक्यातील मांडकी बुद्रुकमध्ये कोरोनाने पाचजणांचा मृत्यू ...
चिपळूण : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या तालुक्यातील मांडकी बुद्रुकमध्ये कोरोनाने पाचजणांचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसांतील घटनांनी येथील ग्रामस्थ हडबडून गेले आहेत. अजूनही काहीजण कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून सरासरी दीडशेच्या आसपास कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरु आहे. सध्याच्या स्थितीला तालुक्यात मांडकी बुद्रुक हे गाव तितकेच चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी या गावातील तिघांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाला. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पहिल्या टप्प्यात ८५ जणांची, तर दुसऱ्या टप्प्यात ११२ जणांची तपासणी केली असता तब्बल ४४ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर गावातील प्रत्येक ग्रामस्थांची चाचणी करण्यात आली.
यातील कोरोनाबाधित पण लक्षणं नसलेल्या रुग्णांवर वहाळ फाटा येथील कोरोना केअर सेंटर येथे आठ दिवस उपचार करण्यात आले. यातील आठ-दहाजणांना सर्दी-ताप अशी काही लक्षणं दिसून आल्याने त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, अजूनही तीन रुग्ण उपचार घेत आहेत.
मांडकी बुद्रुक गावच्या बौद्धवाडीतील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर खांबेवाडी व लोंढेवाडीतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे वय सरासरी ६० वर्षांचे होते. तूर्तास या गावातील बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली, तरी ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात होत्या.
.............................................
मांडकी बुद्रुक गावातील कोरोनाच्या परिस्थितीवर आता नियंत्रण आले आहे. अजूनही तिघेजण कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सुधारली आहे. शिवाय ग्रामपंचायत स्तरावर नियमांचे पालन काटेकोर केले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावात निर्माण झालेले भीतीचे वातावरण आता निवळले आहे.
- योगेश सोनवणे, ग्रामसेवक, मांडकी बुद्रुक, चिपळूण.