CoronaVirus Lockdown : आता समुद्रावरही करडी नजर, विशेष गस्तीपथक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:32 PM2020-03-30T17:32:19+5:302020-03-30T17:35:33+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परदेशाप्रमाणेच मुंबई - पुणे येथून येणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यातच मुंबईहून येणारे आता सागरी मार्गाचा अवलंब करून येत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशाने मुंबई - रत्नागिरी सागरी मार्गावर गस्ती अभियान सुरू करण्यात आले आहे.
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परदेशाप्रमाणेच मुंबई - पुणे येथून येणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यातच मुंबईहून येणारे आता सागरी मार्गाचा अवलंब करून येत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशाने मुंबई - रत्नागिरी सागरी मार्गावर गस्ती अभियान सुरू करण्यात आले आहे.
देशासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांमध्ये कुठलेही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यातच रत्नागिरीतील मुंबई - पुणे येथे असलेले नागरिक सध्या भीतीने रत्नागिरीत परतत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. गेल्या तीन - चार दिवसात सागरी मार्गे बोटीने काही रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
जिल्ह्याला कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बाहेरून आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी माहिती देणे सक्तीचे केले असूनही ही माहिती या व्यक्ती लपवत आहे. या घटना पाहता सागरी मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर सक्त नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मत्स्य विभाग, कस्टम विभाग, सागरी तटरक्षक दल यांच्या समन्वयाने हे विशेष गस्ती अभियान सुरु करण्यात आले आहे.
यासाठी फिनोलेक्स कंपनीने समुद्र गस्तीसाठी खास टक बोट उपलब्ध करून दिली आहे. त्यातून सागरी मार्गावर सागरी पथकाच्या माध्यमातून आता सागरी वाहतुकीवर गस्त ठेवली जाणार आहे.
प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त एन. व्ही. भादुले, विकास अधिकारी, जे. डी. सावंत, सहाय्यक बंदर निरीक्षक, सुहास गुरव आदींच्या उपस्थितीत मुंबईहून रत्नागिरी असा समुद्रमार्गे होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
रस्त्यावर तपासणी होत असल्याने समुद्रमार्गे आले..
जिल्हा बंदी असतानाही वेगवेगळ्या सहा मच्छिमार बोटी करून असगोली, वेळणेश्वर येथील २१ व हेदवतड, तवसाळ, कोंडकारुळ, बोऱ्या, बुधल आदी ठिकाणचे मिळून असे ५०हून अधिक मच्छिमार गुहागर तालुक्यात पाडव्यादिवशी आले आहेत. या सर्व मच्छिमारांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर या मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ते बोटी करून आले आहेत. यामधील बहुतांश मच्छिमार हे कामाला असलेल्या बोटींमध्येच वास्तव्य करतात. तसेच मुंबईतून रत्नागिरी तालुक्यातील वरवडे तिवरी बंदर येथे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.