CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:52 PM2020-03-30T17:52:44+5:302020-03-30T17:55:03+5:30
प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश जाहीर केला आहे.
रत्नागिरी : प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश जाहीर केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील दुचाकी वाहनांना २८ तारखेच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
या आदेशाची शुक्रवारपासूनच अंमलबजावणी होणार होती. परंतु लोकांच्या जीवनाश्यक गरजेकरिता प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले नव्हते. परंतु नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर शनिवारी वाहने रस्त्यावर आणली त्यामुळे लोकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला.
यापुढे सर्वसामान्य नागरिक दुचाकी घेऊन रस्त्यावर येऊ शकणार नाहीत. असे कोणी आल्यास आता त्यांच्यावर कडक कारवाई करणेत येणार आहे. याआधी प्रशासनाने चारचाकी व तीनचाकी व अवजड वाहनांवर जिल्ह्यात बंदी घातली आहे. लोकांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेतला जात असल्याने अखेर प्रशासनाला कडक धोरण स्वीकारण्यात आले आहे.